satara सलून व्यवसायात उतरली ‘अपेक्षा’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

Satara : सलून व्यवसायात उतरली ‘अपेक्षा’

ओगलेवाडी : व्यवसाय किंवा क्षेत्र कोणतेही असो, त्यात केवळ पुरुषांची मक्तेदारी होऊच शकत नाही; परंतु आजही मुलींनी एखाद्या वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकले, की लोक नाक मुरडतात. त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करत परिश्रम करत राहायचे, हा आदर्श भारतीय संस्कृतीतील अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी घालून दिला आहे. तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न असल्याचे सलून व्यवसाय करणाऱ्या सैदापूर (ता. कऱ्हाड) येथील अपेक्षा शेटे उत्साह व आत्मविश्वासाने सांगत होती.

सलूनचा व्यवसाय हा केवळ पुरुषांची मक्तेदारी आहे, असा समज आजही निमशहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आहे. मुलगी पुरुषाची दाढी करतेय, हे पाहिले की अनेकांचे डोळे उंचावतात. मनात ना- ना तऱ्हेचे विचार निर्माण होतात. अशा परिस्थिती सैदापूरमधील अपेक्षा शेटे ही सलूनच्या व्यवसायात उतरली आहे. या व्यवसायाची आवडही आहे आणि भविष्यकाळात त्यात मोठा स्कोपही. त्यामुळे धाडसाने या व्यवसायात उतरली आहे. लवकरच कॉस्मेटोलॉजीचे उच्च शिक्षण घेऊन महिलांना त्यांच्या उन्नतीस जास्तीतजास्त संख्येने यात सहभागी होण्यासाठी हेअर अॅकॅडमी स्थापन करण्याचाही तिचा निर्धार असल्याचे तिने सांगितले.

कोणतीही नवी गोष्ट करताना विरोध होतोच. विशेषतः महिला- मुलींना जास्तच. त्याला विरोध तसेच तिरस्कारही होतोच. तोच पत्करून अपेक्षा विजय शेटे ही युवती सलूनच्या व्यवसायात उतरली आहे. मोठ्या शहरांमध्ये महिला- युवती सलूनच्या व्यवसायात आहेत. मात्र, ग्रामीण भागात त्याचा अजूनही ट्रेंड आलेला नाही. मात्र, जिल्ह्यात पहिल्यांदाच तिने हे धाडस केले आहे. सध्या काही लोक तिला नाकं मुरडत आहेत. इतर व्यवसाय कर असा सल्ला देत आहेत. सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, तेव्हाही टोकाचा विरोध झाला होता. मात्र, आपली आवड व जिद्द कायम ठेवत त्यांना किंमत न देता याच व्यवसायात करिअर करायचे, असा मनाशी पक्का निर्धार केला आहे.

कोरोना संसर्गामुळे झालेल्या लॉकडाउनच्या काळात तिचे दोन भाऊ, चुलते संजय शेटे यांच्याकडून व्यवसायाचे शिक्षण घेत होते. आपणही पारंपरिक व्यवसाय शिकला पाहिजे, असे अपेक्षाला वाटले. तिने चुलते संजय शेटे यांना ही मनातील इच्छा बोलून दाखवली. त्यांनीही ते मान्य केले. त्यानुसार त्यांनी केस कापणे, दाढी करणे, ब्युटी पार्लर संबंधित प्रशिक्षण तिला दिले व सध्या तिने स्वतंत्रपणे आपला व्यवसाय सुरू केला आहे. आपली आवड जपण्यासाठी कोणत्याही विरोधाला सामोरे जाण्याचे धाडस दाखवून अपेक्षाने सर्वच मुलींसमोर आदर्श निर्माण केला आहे.

कुटुंबाचे पाठबळ महत्त्वाचे...

कोणतेही क्षेत्र मुलींसाठी वर्ज्य नाही. आवड असेल, त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळण्यासाठी उद्दिष्ट ठेऊन कष्ट करायचे. यश हे मिळतेच. त्यामुळे मुलींनी सर्वच क्षेत्रात भक्कमपणे उभे राहिले पाहिजे. माझे वडील व चुलते यांनी मला साथ दिली. त्यातून मिळालेल्या ज्ञानातून मी समाजातील अन्य मुलींना सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. माझ्या कुटुंबाप्रमाणेच आपल्या मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उभे राहण्यासाठी कुटुंबांनी साथ द्यावी, असे आवाहन अपेक्षाने केले आहे.

सन्मान... स्त्री शक्तीचा

भारतीय संस्कृतीत स्त्रीशक्तीच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुर्गेच्या उपासनेच्या माध्यमातून हेच सर्व समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न आपल्या संस्कृतीने केला आहे. इतिहासातील अनेक स्त्रियांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, सावित्रीबाई फुले अशी भली मोठी यादी आहे, तरीही आजही काही ठिकाणी मुलींना समानतेचे स्थान मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी अपेक्षाचे वडील व चुलते यांच्याकडून झाले आहे. हा संपूर्ण समाजासमोर एक आदर्श आहे. त्यातून मुलींना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात स्थान निर्माण करण्यासाठी कुटुंबीयांनी पाठबळ द्यावे, हा संदेश मिळाला आहे.