बियाण्यांच्या किमती भिडल्या आकाशाला, कोरोना विषाणू व लॉकडाउनचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने बळिराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडल्यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांचे आर्थिक "बजेट' पूर्णतः कोलमडत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

बिजवडी (जि. सातारा) : दुष्काळ, कोरोना, लॉकडाउन हे तिहेरी संकट आणि त्यातच खरीप हंगामातील बियाण्यांच्या किमतीही आकाशाला भिडल्याने माण तालुक्‍यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. त्यामुळे तो हवालदिल झाला आहे. 

माण तालुक्‍याच्या नशिबी कायम दुष्काळी परिस्थिती. उरमोडीच्या पाण्यामुळे व जलसंधारणांच्या कामांमुळे आता कुठे ही परिस्थिती हळूहळू बदलत चालली होती. मात्र, आधीच दुष्काळ, मग कोरोना अन्‌ त्यात लॉकडाउनमुळे पुन्हा या माणदेशातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. या काळात शेतातील पिकांची अवस्था वाईट झाली. या काळात लॉकडाउनमुळे शेतीमाल विक्रीवाचून जनावरांना व उर्वरित बांधावर टाकून देण्याची वेळ बळिराजावर आली. वाहतूक व्यवस्था बंद असल्याने त्याचा फटका बळिराजाला मोठ्या प्रमाणात बसला. 

मोठ्या बाजारपेठा, आठवडे बाजार, मंडई बंद राहिल्याने तसेच लग्न, जागरण-गोंधळ, वास्तुशांती अशा सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी आल्याने भाजीपाला विकता आला नाही. उत्पादित मालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे शेतीमालाची विक्री कमी प्रमाणात होऊन शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीमाल कवडीमोल दराने विकावा लागला. त्यानंतर यावेळी मॉन्सूनच्या पावसाने योग्यवेळी हजेरी लावल्याने या परिस्थितीतून कसेबसे सावरत बळिराजाने खरीप पेरणीपूर्व मशागतीचे कामे उरकून खरीप पेरणीला मोठ्या जोमाने सुरवातही केली. परंतु, सर्वच बियाण्यांच्या किमती आकाशाला भिडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.

कोरोना महामारीचे संकट घोंगावत असतानाच बियाणे उत्पादक कंपन्यांनी बियाण्यांच्या दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ केल्याने बळिराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडल्यामुळे बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांचे आर्थिक "बजेट' पूर्णतः कोलमडत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

""जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने बाजरी, मूग पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. परंतु, शेतकऱ्यांना चार पैसे मिळवून देणारी पिके मका, कांदा व इतर बियाण्यांच्या किमतीच्या दरात मोठ्या प्रमाणात दरवाढ झाल्याने बियाणे खरेदी करताना काटकसर करावी लागत आहे.'' 

-अर्जुन अवघडे, प्रगतशील शेतकरी, वावरहिरे, ता. माण 

""बाजरी, मूग, मका, घेवडा आदी बियाण्यांच्या भाववाढीलाही "लॉकडाउन'चा फटका बसला असून, कंपन्यांतूनच यावर्षी 25 ते 30 टक्के वाढीव किमती आल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गाला गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वाढीव दराने बियाणे घ्यावे लागत आहे.'' 

-प्रशांत कदम, शिवांश कृषी सेवा केंद्र, दुधेबावी, ता. फलटण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Farmers In Financial Crisis Due To Increase In Seed Prices