कांदा उत्पादकांचे तेल ही गेले तूपही गेले आणि हाती राहिले धुपाटणे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

वातावरणात बदल होत असल्यामुळे ऐरणीतील कांदा खराब होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आता ऐरणीतून कांदा काढून विक्री करण्यास सुरवात केली आहे. मात्र, सध्या कांद्याला सात ते आठ रुपये भाव मिळत आहे.

वाठार स्टेशन (जि. सातारा) : चांगला भाव मिळेल, या आशेवर दोन ते तीन महिन्यांपूर्वी ऐरणीत ठेवलेल्या कांद्याचे दर आणखी कमी झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांची अवस्था "तेल ही गेले तूपही गेले आणि हाती राहिले धुपाटणे' अशी झाली आहे. 

वाठार स्टेशन परिसरातील तळिये, देऊर, जाधववाडी, फडतरवाडी, दानेवाडी, विखळे, बिचुकले, नलवडेवाडी, आसनगाव या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील कांद्याचे पीक घेतले जाते. कांद्याला रोप टाकण्यापासून त्याच्या विक्रीपर्यंत किलोला आठ ते दहा रुपये खर्च येत असतो. ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये कांद्याची सर्रास लागण केली जाते. साधारण चार महिन्यांनंतर मार्च महिन्यामध्ये कांदा काढणी सुरू होते. यावर्षी मार्चमध्ये कांदा काढणीवेळी सुमारे दहा ते 12 रुपये भाव होता. परंतु, चांगला भाव मिळवा, या मोठ्या आशेने येथील शेतकऱ्यांनी हा कांदा ऐरणीत ठेवण्यास पसंती दिली.

मात्र, आता जवळपास तीन महिने उलटून गेले तरी कांद्याचा भाव वाढत नसून दर कमीच होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच वातावरणात बदल होत असल्यामुळे ऐरणीतील कांदा खराब होण्याची शक्‍यता अधिक असते. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी आता ऐरणीतून कांदा काढून विक्री करण्यास सुरवात केली आहे. मात्र, सध्या कांद्याला सात ते आठ रुपये भाव मिळत आहे. खरे तर कांदा काढणीवेळी कांद्याचे वजन जास्त भरते. आता सध्या ऐरणीतून काढलेल्या कांद्याचे वजन कमी होऊन भावही पूर्वीपेक्षा कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था "तेल ही गेले तूपही गेले आणि हाती राहिले धुपाटणे' अशी झाली आहे. 

""वाठार स्टेशन परिसरात रब्बी हंगामात ज्वारीबरोबर कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात असून, या पिकावरच पूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन केले जाते. त्यामुळे शासनाने कांद्याला हमी भाव ठरवून द्यावा.'' 

-प्रमोद मतकर, शेतकरी, विखळे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Farmers In Financial Difficulties Due To Reduction In Onion Prices