esakal | पीकविमा योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश झाल्याने शेतकरी आनंदित
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

नाशवंत असलेल्या या पिकाचे बऱ्याचदा मोठे नुकसान झाले आहे. परंतु, हे महागडे पीक शासनाच्या पीकविमा योजनेत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत होते. त्यामुळे या उत्पादक शेतकऱ्यांमधून या पिकाचा समावेश पीकविम्यात करावा, ही बरेच दिवसांची मागणी होती.

पीकविमा योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश झाल्याने शेतकरी आनंदित

sakal_logo
By
रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत हवामान आधारित पीकविमा योजनेत स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश झाल्याने महाबळेश्‍वरातील शेतकरी आनंदले असून, आणखी जोमाने हंगामाच्या तयारीला लागले आहेत. 

महाबळेश्वर तालुका हा स्ट्रॉबेरीचे आगर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. महाबळेश्वरच्या लाल चुटुक, गोड, मधाळ स्ट्रॉबेरीची चव काही न्यारीच. परंतु, येथील शेतकरी अवेळी पाऊस, वातावरणातील बदल, बाजारपेठेतील मंदी, गारपीट, आता तर कोरोनाच्या महासंकटामुळे पूर्णपणे आतबट्ट्यात आला आहे. यावर्षी तर अस्थिर परिस्थितीने संपूर्ण स्ट्रॉबेरीचे क्षेत्र निम्म्याने घटले आहे. तालुक्‍यातील प्रामुख्याने भिलार, मेटगुताड, अवकाळी, भोसे, राजपुरी, तापोळा, कुंभरोशी या विभागात स्ट्रॉबेरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तालुक्‍याचे स्ट्रॉबेरीचे अडीच ते तीन हजार हेक्‍टर क्षेत्र लागवडीखाली आहे. दरवर्षी परदेशातून 18 ते 20 लाख रोपे आयात केली जातात. परंतु, कोरोना, लॉकडाउन, वातावरण व अस्थिर परिस्थितीने तालुक्‍यात फक्त नऊ लाख रोपांची आवक झाली आहे. त्यामुळे निम्म्याने यावर्षी स्ट्रॉबेरीची लागवड कमी होणार आहे. 

अलीकडच्या काळात तीन ते चार वर्षांत स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. वातावरणातील बदलामुळे शेतकरी हतबल झाला आहे. रानटी जनावरांचा पिकांना उपद्रव, नोटा बदलीनंतर झालेली मोठी आर्थिक मंदी आणि आता गतवर्षी हंगामातच कोरोनाने डोके वर काढल्याने अक्षरशः शेतकऱ्यांची फळे शेतात कुजली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले. आर्थिक फटक्‍यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. 

नाशवंत असलेल्या या पिकाचे बऱ्याचदा मोठे नुकसान झाले आहे. परंतु, हे महागडे पीक शासनाच्या पीकविमा योजनेत नसल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत होते. त्यामुळे या उत्पादक शेतकऱ्यांमधून या पिकाचा समावेश पीकविम्यात करावा, ही बरेच दिवसांची मागणी होती. यासाठी पाठपुरावा केल्याने स्ट्रॉबेरी पिकाचा समावेश पीकविमा योजनेमध्ये या वर्षापासून करण्यात आल्याने शेतकरी आनंदले आहेत. यामुळे स्ट्रॉबेरीला संरक्षण मिळाले आहे. 


""मुख्यमंत्री उध्दव ठाकरे महाबळेश्वर दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्याशी चर्चा झाली होती. एकनाथ शिंदे यांनीही याला दुजोरा देत पाठपुरावा केल्याने स्ट्रॉबेरीला आता विम्याचे संरक्षण मिळाले आहे.'' 

-बाळासाहेब भिलारे, अध्यक्ष, स्ट्रॉबेरी ग्रोव्हरस असोसिएशन, दिल्ली 


""स्ट्रॉबेरी पीकविम्याची आमची बऱ्याच दिवसांची मागणी होती. पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील यांनी पाठपुरावा केल्याने या पीकविम्याचा निर्णय झाला आहे.'' 

-राजेंद्र राजपुरे, संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक 

""महाबळेश्वरच्या स्ट्रॉबेरीची जागतिक बाजारपेठेत वेगळी ओळख आहे. एकामागोमाग एक अशा अनेक संकटांनी स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी हतबल झाला आहे. विम्याचा समावेश झाल्याने आर्थिक आधार मिळणार आहे.'' 

-किसन भिलारे, स्ट्रॉबेरी तज्ज्ञ 


""लाखोंची खते, औषधे वापरूनही पीक हातातून जात आहे. "कधी पीक येते तर भाव नसतो व भाव असतो तर पीक जाते,' या चक्रात शेतकरी अडचणीत आहे. पीकविम्याचा हा आधार आता सापडल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत.'' 

-विठ्ठल दुधाणे, शेतकरी 

(संपादन : पांडुरंग बर्गे) 

loading image
go to top