मराठवाडी धरणावर पाणी बघ्यांच्या गर्दीने दुर्घटनेची भीती

Satara
Satara
Updated on

ढेबेवाडी (जि. सातारा) : पाटबंधारे विभागाचा मनाई आदेश व सूचना धुडकावून मराठवाडी धरणात वाढणारे पाणी बघायला लोक गर्दी करू लागल्याने दुर्घटनेची भीती निर्माण झाली आहे. धरणस्थळी सुरू असलेली विविध कामे सध्या पावसाळ्यामुळे अर्धवट स्थितीत ठप्प असल्याने तेथे सुरू असलेला नागरिकांचा वावर जिवावर बेतू शकतो. त्यामुळे धरणाच्या काठावर दररोज भरणाऱ्या येड्यांच्या जत्रेवर आता पोलिसांनीच कारवाईचे पाऊल उचलले आहे. 

मराठवाडी धरणाची पाणीसाठवण क्षमता 2.73 टीएमसी एवढी असली तरी सद्य:स्थितीला त्यात 1.4 टीएमसी पाणीसाठा होईल एवढेच बांधकाम पूर्ण झालेले आहे. पिचिंग, मातीकाम, इंटकवेल, सांडवा, गेट आदी कामे प्रगतिपथावर असली तरी पावसाळ्यामुळे सध्या ती ठप्पच आहेत. प्रत्येक पावसाळ्यात धरणात वाढलेला पाणीसाठा बघायला येणारांच्या गर्दीला हुसकावता-हुसकावता धरण व्यवस्थापनाच्या नाकीनऊ येते. अनेकजण धरणाच्या सांडव्यावर आणि त्या परिसरातील उंच धोकादायक ठिकाणी जावून सेल्फी काढतानाही दिसतात.

आडोसा गाठून काहीजणांच्या रंगीत-संगीत पार्ट्याही त्या परिसरात सुरू असतात. त्यावर नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाने ठिकठिकाणी सूचना फलक लावून अतिउत्साहींना गंभीर धोक्‍याबाबत सावध केले असले तरी त्यांच्यावर त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. सध्या मराठवाडी धरण "ओव्हर फ्लो' होण्याच्या मार्गावर असताना बेफिकीर अतिउत्साही नागरिक वाढलेले पाणी बघायला धोकादायक ठिकाणी ये-जा करताना दिसत आहेत. अनेकजण उंचावर उभे राहून स्वतःसह धरणाची सेल्फी घेत असल्याने धरणस्थळावरील कर्मचाऱ्यांच्या काळजाचे पाणी होत आहे. संपूर्ण धरण परिसरात ये-जा करण्यास मनाई असताना नागरिक त्यास जुमानत नसल्याने धोका वाढल्याचे प्रकल्प अभियंता संदीप मोरे यांनी सांगितले. ते म्हणाले, ""याबाबत कायदेशीर कारवाईही सुरू आहे. पालकांनी जागरूकता पाळून मुलांना इकडे फिरकण्यास मज्जाव करण्याची गरज आहे.'' 


""मराठवाडी धरण परिसरातील अनेक ठिकाणी धोकादायक स्थिती आहे. आमचे पेट्रोलिंग सुरू असून, जीव धोक्‍यात घालून फिरणाऱ्या हुल्लडबाजांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.'' 
-उत्तमराव भजनावळे, 
सहायक पोलिस निरीक्षक, ढेबेवाडी 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com