पाटणमध्ये हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती; बळीराजा हवालदिल

जालिंदर सत्रे 
रविवार, 2 ऑगस्ट 2020

नाचणी आणि भाताच्या पुनर्लागणीसाठीचे तरवे मर्यादेच्या पुढे गेल्यामुळे व भातासाठी अपेक्षित असणारा पाऊस न पडल्याने लागणी केलेल्या भाताच्या पिकांत पुढील वाढ खुंटली आहे. 

पाटण (जि. सातारा) : पेरणी, आंतरमशागत व खतांची मात्रा वेळेवर झाल्याने या वर्षी इतर वर्षांच्या तुलनेत खरिपाची पिके जोमात आली आहेत. मात्र, पावसाने दडी मारल्याने काबाडकष्ट करून हातातोंडाशी आलेली पिके वाया जाणार, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. जुलैमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पर्जन्यधारा न पाहाता वैशाख वणव्यासारखे ऊन पाहण्याचा योग शेतकऱ्यांच्या नशिबी आला आहे. 

जूनच्या पहिल्या आठवड्यात निसर्ग चक्रीवादळाने झालेल्या पावसामुळे खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. पावसाने ओढे वाहू लागले होते. मात्र, 20 जूनच्या दरम्यान पावसाने विश्रांती घेतली तोपर्यंत पिकांची उगवण चांगली होऊन शेतकऱ्यांनी आंतरमशागतीच्या कामाला सुरुवात केली होती. 20 जूननंतर पावसात सातत्य न राहिल्याने खळाळणारे ओढे आटले आणि भात व नाचणीच्या पुनर्लागणीची कामे रखडली. 

चार जुलैला बेंदूर सणादिवशी संततधार पावसास पुन्हा सुरुवात झाली. मात्र, सक्रिय झालेल्या या पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे भात आणि नाचणी पुनर्लागणी करताना बळीराजाची दमछाक झाली. नाचणी आणि भाताच्या पुनर्लागणीसाठीचे तरवे मर्यादेच्या पुढे गेल्यामुळे व भातासाठी अपेक्षित असणारा पाऊस न पडल्याने लागणी केलेल्या भाताच्या पिकांत पुढील वाढ खुंटली आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील भात व नाचणी लागणीचे क्षेत्र काही ठिकाणी लागणीविना पडून राहिले आहे. 

चार जुलै दरम्यान झालेल्या पावसाचा अपवाद सोडला, तर पूर्ण अतिपावसाचा जुलै महिना कडक उन्हाळा देऊन गेला आहे. गेली महिनाभर शेतकरी चातकाप्रमाणे पाऊस पुन्हा सक्रिय होऊन बरसेल अशी वाट पाहात आहे. दोन ते तीन दिवसांत एखादी पावसाची सर येते. त्यामुळे पिकांना जीवदान मिळत आहे. त्याचा फायदा कडधान्य पिकांना होईल असे वाटते. मात्र, भात व नाचणी ही खरिपातील तालुक्‍याची दोन मुख्य पिके सातत्याने पावसाने दडी मारल्याने धोक्‍यात आली आहेत.

योग्यवेळी पेरणी, आंतरमशागत व रासायनिक खतांच्या मात्रा खरिपाला मिळाल्या असल्यातरी संततधार पाऊस नसल्याने खरिपातील मुख्य पिके असणारे भात व नाचणीचे क्षेत्र एकूण उत्पन्नावर परिणाम करणार आहे. काबाडकष्ट करून हातातोंडाशी आणलेली पिके पावसाविना वाया जाणार असल्यामुळे कोरोनात आर्थिक कणा मोडलेला शेतकरी पावसाविना पूर्ण कोलमडणार, असे वाटते. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Fear Of Wasting Crops In Patan Farmers Nervous