कऱ्हाडमध्ये तुटपुंज्या मनुष्यबळावर नागरी आरोग्य सुविधा केंद्रातून कोविडविरुद्ध लढा!

Satara
Satara

कऱ्हाड (जि. सातारा) : पडकी, गळकी इमारत, तुटपुंज्या खोल्या आणि तुटपुंज्या कर्मचारी वर्गासह अपुऱ्या साधन सामुग्रीच्या आधाराने येथील नागरी आरोग्य केंद्र कोविडसारख्या महामारीच्या विरोधात लढा देत आहे. कोविडसारख्या जागतिक महामारीतही या नागरी सुविधा केंद्रात कोणत्याच अद्ययावत सुविधा नाहीत, हे दुर्दैव म्हणावे लागेल. 

कऱ्हाड शहरासाठी येथील बुधवार पेठेत तीन खोल्यांच्या इमारतीत 2011 मध्ये नागरी आरोग्य केंद्राची सुरवात झाली. तेथे एक वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, अटेन्डस्‌ यांच्यासह नऊ आरोग्य सेवक व सेविका, दोन परिचारिका असा स्टाफ आहे. त्यांच्यासोबत 28 आशा स्वयंसेविका सध्या त्यांच्या मदतीला आहेत. कोरोनासारख्या महामारीच्या काळात तेथे नागरी आरोग्य सेवा केंद्र खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आले. तुटपुंजा कर्मचारी वर्ग, गळकी इमारत, कोणत्याही अद्ययावत सुविधा नसलेले हे नागरी आरोग्य केंद्र कोविडसारख्या महामारीशी दोन हात करत आहे. अवघे सात आरोग्य सेवक शहरातील लाखाहून अधिक नागरिकांचे आरोग्य सांभाळण्यासाठी धडपडत आहेत. त्यापैकी दोन लसीकरणासाठी गेल्यानंतर पाच आरोग्य सेविकांवर कोरोनाचा मुकाबला सुरू आहे. त्यामुळे एका आरोग्य सेवकावर किमान 12 हजार नागरिकांचा भार आहे.

शहराची लोकसंख्या एक लाख दहा हजाराच्या आसपास आहे. दाट लोकवस्तीसह, विस्तारलेली उपनगरे काम करताना नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे होणार हाल अत्यंत अवघड आहेत. तरीही अशा कठीण अवस्थेमध्ये ते काम करत आहेत. त्यांना वाढीव मनुष्यबळ, अद्ययावत संगणकाची सुविधा, प्रशस्त इमारत अशा साधन सामुग्रीची गरज आहे. पालिका त्यासाठी प्रयत्नही करत आहे. मात्र, पालिकेच्या मर्यादा लक्षात येण्यासारख्या आहेत. त्यामुळे नागरी आरोग्य केंद्रामध्ये सुविधांची वानवा अंगावर झेलत कर्मचारी काम करत आहेत. 

...अशी आहे स्थिती 

नागरी आरोग्य केंद्रात केवळ तीन खोल्या आहेत. त्यातील दीड खोल्याच प्रत्यक्षात वापरात आहेत. पावसाळ्यात अन्य खोल्या गळत आहेत. एक हॉल आहे. त्या हॉलमध्ये एक संगणक, तेथेच फार्मासिस्ट बसतो. तेथेच लॅब टेक्‍निशियनही असतात. नावे नोंदविण्याची सोयही तेथे आहे. त्याच्याशेजारी एक खोली आहे. सात आरोग्य सेविकांनाही तेथेच बसण्याची सुविधा आहे. सध्या कोविडमुळे सोशल डिस्टन्स पाळताना तेथे कसरत करावी लागते. पालिकेने तात्पुरती शेजारील अंगणवाडीची इमारत दिलेली आहे. मात्र, कोविडच्या पार्श्वभूमीवर ती सुविधा अपुरी आहे. पालिका त्यांच्या परीने अधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडेही मनुष्यबळ, अद्ययावत सुविधांसाठी मागणी केली आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com