मासे वाहून जाऊ नयेत म्हणून माणदेशात तलावांना जाळी!

केराप्पा काळेल 
Sunday, 27 September 2020

सद्य:स्थितीमध्येही तलावांच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. परिणामी त्यामध्ये तयार झालेली मत्स्यबीज सांडपाण्यामध्ये वाहून जात आहेत. यामुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. 

कुकुडवाड (जि. सातारा) : यंदा पावसाने दमदार हजेरी लावलेली असल्याने कुकुडवाड परिसरातील गंगोती, जांभुळणी आणि महाबळेश्वरवाडी हे प्रकल्प व पाझर तलाव पूर्णक्षमतेने भरून वाहू लागले असल्याने सध्या या प्रकल्प आणि तलावांत मत्स्य व्यावसायिकांनी मत्स्यबीज सोडलेली आहेत. मात्र, सततच्या पावसाने तलाव ओसंडून वाहत असल्याने मत्स्यबीजही वाहून जात आहे. त्यामुळे मत्स्य व्यावसायिकांना आर्थिक फटका बसतो आहे. 

पुळकोटी येथील वैभव मच्छिमार संस्थेच्या माध्यमातून गंगोती, जांभुळणी आणि महाबळेश्वरवाडी येथील तलावात मत्स्यबीज सोडण्यात आले आहे. सध्या या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तलाव पूर्णक्षमतेने भरून वाहत आहेत. सद्य:स्थितीमध्येही तलावाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे. परिणामी त्यामध्ये तयार झालेली मत्स्यबीज सांडपाण्यामध्ये वाहून जात आहेत. यामुळे मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

वाहून जाणारे मासे तलावातच रोखले जावेत, यासाठी मासे वाहून जाऊ नयेत म्हणून मच्छिमारांनी महागडी जाळी विकत घेऊन सांडव्याच्या समोर लावली आहेत. यामुळे मच्छिमार व्यावसायिकांना अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याचे मच्छिमार व्यावसायिक सांगत आहेत. यंदा परिसरात पावसाने सरासरी ओलांडली आहे. यामुळे सर्व प्रकल्प आणि लहान-मोठे पाझर तलाव ओसंडून वाहत असल्याने ओढे, ओहळी आणि नाल्यांतून मासे वाहून जात आहेत. यामुळे खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवले जात असले तरी मच्छिमार व्यावसायिकांचे दिवाळे निघत आहे. 

""मागील चार वर्षांत दुष्काळ असतानाही आम्ही शासनास ठेका रक्कम भरून हा मोडकळीस आलेला व्यवसाय पोसला. सध्या पाऊस काळ चांगला असल्याने व्यवसाय तेजीत येईल असे वाटत होते. मात्र, सततच्या पावसाने तलाव भरून वाहत असल्याने मत्स्यबीज वाहून जाऊन मोठे नुकसान होत आहे. शासनाने या व्यवसायास मदत देऊन चालना द्यावी.'' 

-युवराज बनगर, अध्यक्ष, वैभव मच्छिमार संस्था 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Financial Blow By Carrying Fish Seeds In Maan Taluka