esakal | एकाच रात्रीत पाच जण कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाचीही तारांबळ

बोलून बातमी शोधा

कोरोना

बनपुरी (ता. खटाव) येथे शनिवारी रात्री आणखी पाच जण कोरोनाबाधित सापडल्याने खटाव तालुक्‍याची चिंता फारच वाढली आहे. प्रशासनानेही बनपुरीत ठाण मांडले असून, संपूर्ण गाव सील करण्यात आले आहे. 

एकाच रात्रीत पाच जण कोरोनाबाधित आढळल्याने प्रशासनाचीही तारांबळ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कातरखटाव (जि. सातारा) : राजस्थानातील कोटा येथून 21 तारखेला 43 लोकांची गाडी बनपुरीत आली होती. त्यामध्ये बनपुरीतील 25, येरळवाडीतील चौघे, दातेवाडीचा एक, तरसवाडीचे सात जण, कदमवाडीचे चौघे, मायणीचे दोघे अशा लोकांनी प्रवास केला होता.

बनपुरीतील 25 जण वगळता इतर प्रवाशांना मायणीत क्‍वारंटाइन केले होते. तर बनपुरीकरांना बनपुरी शाळेत क्‍वारंटाइन केले होते. तरीही त्यातील एक 38 वर्षीय युवक व त्याचे कुटुंबीय घरामध्येच क्‍वारंटाइन झाले. त्यानंतर संबंधित युवक बुधवारी कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले.

हा युवक बाधित असल्याचा अहवाल आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांची व निकटच्या सहवासीतांची तपासणी सुरू होती. यामध्ये या युवकाची दोन मुले, पत्नी, आई, वडील व कोटा येथून आलेले बनपुरी येथीलच सहप्रवासी अशा तेरा जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये आई, वडील व इतर काही प्रवासी वगळता पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बनपुरीमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. या अहवालानुसार दोन मुले, दोन स्त्रिया व एका पुरुषाचा समावेश आहे. 

या बाधित कुटुंबाचा गावातील भाजीपाला विकणाऱ्या युवकाशी तसेच गावातील इतर लोकांशी संपर्क आला होता. घरामध्ये वरच्या मजल्यावर या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली होती. सख्खे आणि चुलत भाऊ असे मिळून 11 माणसांचे कुटुंब येथे राहत होते. सात दिवसांपूर्वी खोकल्याचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले होते. आता गावातील व संपर्कात आलेल्या सर्व लोकांची आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. 

दरम्यान, तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. युनूस शेख, पोलिस निरीक्षक अशोक पाटील, डॉ. संतोष मोरे, डॉ. वैशाली चव्हाण आदी कोरोना समितीतील अधिकाऱ्यांनी गावास भेट दिली असून परिसर सील करण्यात आला आहे.