कोयनेनंतर मराठवाडी धरणातही 'गढूळाचं पाणी'; पाण्यानं बदलला 'रंग' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwadi Dam

धरणात मोठ्या प्रमाणात माती वाहून आल्याने गाळाचे प्रमाण वाढणार आहे.

कोयनेनंतर मराठवाडी धरणातही 'गढूळाचं पाणी'; पाण्यानं बदलला 'रंग'

ढेबेवाडी (सातारा) : मराठवाडी धरणाच्या (Marathwadi Dam) जलाशय परिसरातील डोंगरात प्रचंड प्रमाणात भूस्खलन (Landslide) झाल्याने नदी व ओढ्यातून मोठ्या प्रमाणात तांबडी माती वाहून आली असून, यावर्षी गढूळ पाण्याने धरण तुडुंब भरल्याचे वेगळेच चित्र दृष्टीला पडत आहे. या प्रकारामुळे धरणात गाळाचे प्रमाण वाढण्याचीही चिन्हे आहेत.

वांग नदीवरील (Wang River) मराठवाडी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता २.७३ टीएमसी असली तरी तब्बल २४ वर्षे उलटूनही बांधकाम पूर्ण न झाल्याने सद्य:स्‍थितीस त्यात दोन टीएमसीपर्यंतच पाणीसाठा करणे शक्य होत आहे. धरणाच्या बुडीत क्षेत्रातील गावांमध्ये अजूनही काही धरणग्रस्त कुटुंबे वास्तव्यास आहेत, त्याशिवाय शेवटच्या टोकाला असलेल्या जिंती गावापर्यंत धरणातील पाण्याचा फुगवटा पोचत असल्याने पावसाळ्यात जिंती-सावंतवाडी, जितकरवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी, धनावडेवाडी आदी गावांना अडचणींशी सामना करावा लागत आहे. यंदा अतिवृष्टीमुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने नदी, नाली व ओढ्यातून धरणात मोठ्या प्रमाणात माती वाहून आली असून सध्या पावसाची उघडीप असली तरी नदी व ओढ्यातून जलाशयात गढूळ पाण्याची आवक सुरूच आहे.

हेही वाचा: साठीतील कोयना धरण 51 वेळा ठरले 'बाहुबली'

धरणात मोठ्या प्रमाणात माती वाहून आल्याने गाळाचे प्रमाण वाढणार आहे. पूर ओसरत असताना आता उघड्या पडलेल्या जलाशय परिसरात दिसणाऱ्या गाळाच्या ढिगाऱ्यातून हीच बाब स्पष्ट होत आहे. दरम्यान, जलाशय परिसरात अजूनही डोंगर खचून दरडी कोसळतच आहेत. धोका निर्माण झाल्याने जिंती परिसरातील काही वाड्यावस्त्यांतील नागरिकांना ढेबेवाडी व जिंती येथे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. मराठवाडी धरणातील आजची पाणीस्थिती पुढीलप्रमाणे होती. पाणीपातळी ६५०.६० मीटर, एकूण पाणीसाठा ५४.६३ दशलक्ष घनमीटर, जिवंत पाणीसाठा ५४.४० दशलक्ष घनमीटर, एकूण १०४.३७ टक्के, दिवसभरातील पाऊस एक मिलिमीटर, एकूण पाऊस १२१६ मिलिमीटर, पाण्याची आवक एक हजार ७२६ क्युसेक, सांडव्यातील विसर्ग १५५१ क्युसेक, गेटमधील विसर्ग १७५ क्युसेक.

Web Title: Satara Flood The Colour Of Water In Marathwadi Dam Changed

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Marathwadi DamWang River
go to top