महाबळेश्वरात मोफत ऑक्‍सिजन पुरवठा, 13 नगरसेवकांच्या गटाचा उपक्रम

अभिजित खुरासणे 
Wednesday, 16 September 2020

महाबळेश्वरातील कोरोना रुग्णांसाठी सामाजिक बांधिलकीच्या हेतूने प्रत्येक प्रभागात एक अशा आठही प्रभागांत ऑक्‍सिजन कॉंन्सट्रेटर मशिन तातडीने उपलब्ध करून देणार असून, ऑक्‍सिजन मशिनही वैद्यकीय सल्ल्यानुसार गरज असेल त्यांना मोफत वापरण्यास देण्यात येणार आहे. 
 

महाबळेश्वर (जि. सातारा) : पालिकेतील 13 नगरसेवकांच्या गटाने शहरवासीयांसाठी ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर मशिन उपलब्ध करून दिले असून, शहारातील प्रत्येक प्रभागात रुग्णसेवेसाठी मोफत ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करून देणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष अफझल सुतार यांनी दिली. 

महाबळेश्वर शहरातील कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी कोणत्याही रुग्णाला कोणत्याही क्षणी ऑक्‍सिजनची गरज भासू शकते. ऑक्‍सिजनसाठी काहींना खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. तसेच महाबळेश्वर तालुक्‍यात ऑक्‍सिजन कमी पडत असलेल्या रुग्णांना ते तालुक्‍यात उपलब्ध होत नाहीत. या पार्श्‍वभूमीवर महाबळेश्वरातील कोरोना रुग्णांसाठी सामाजिक बांधिलकीच्या हेतूने प्रत्येक प्रभागात एक अशा आठही प्रभागांत ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर मशिन तातडीने उपलब्ध करून देणार असून, ऑक्‍सिजन मशिनही वैद्यकीय सल्ल्यानुसार गरज असेल त्यांना मोफत वापरण्यास देण्यात येणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष सुतार यांनी दिली.

कोरोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर या मशिन महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयास देण्यात येणार असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. माजी नगराध्यक्ष (कै.) पी. डी. पार्टे यांच्या स्मरणार्थ उद्योजक संतोष पार्टे यांनी शहरातील या पहिल्या ऑक्‍सिजन कॉन्संट्रेटर मशिनचे लोकार्पण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते केले. या वेळी उपनगराध्यक्ष सुतार, ज्येष्ठ नगरसेवक नासिर मुलाणी, संदीप साळुंखे, रवींद्र कुंभारदरे, प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्तात्रय वाडकर, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष रोहित ढेबे, किरण शिंदे, तौफिक पटवेकर, संदीप मोरे, उमेश रोकडे, दिनेश बिरामणे, रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. 

गेले सहा महिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पत्रकार जोखीम घेऊन काम करत आहेत. या कोरोना योद्‌ध्यांना उच्च दर्जाचे मास्क, सॅनिटायझर, फेसशिल्ड आदी सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाच्या साहित्याचे वाटपही या 13 नगरसेवकांच्या गटाकडून करण्यात येणार असल्याची माहिती नगरसवेक साळुंखे, मुलाणी यांनी दिली. 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Free Oxygen Supply In Mahabaleshwar An Initiative Of A Group Of 13 Corporators