esakal | अखेर सातारा- सांगलीत होणार जल्लोष...
sakal

बोलून बातमी शोधा

निमसोड घरवापसी

सातारा, सांगली जिल्ह्यांतील काही गलई बांधव नेपाळ देशात गेली अनेक वर्षे व्यवसायानिमित्त कार्यरत आहेत; पण कोरोनाचा फेरा आला आणि जगभरात झालेल्या लॉकडाउनमुळे ते गलई बांधवही चांगलेच अडचणीत आले होते. व्यवसाय बंद होण्याबरोबर भारतात येण्यातही त्यांच्यापुढे अडथळे होते. अखेर उत्तर प्रदेश मराठी संघटनेने केलेल्या पाठपुराव्यामुळे त्या बांधवांना मायदेशात येण्याची वाट मोकळी झाली आहे. येत्या दोन दिवसांत त्यांची वाहने गावांमध्ये पोचणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

अखेर सातारा- सांगलीत होणार जल्लोष...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निमसोड (जि.सातारा) : बरेच दिवस झाले नेपाळस्थित मराठी समाजातील परिवार कोरोना संकटामुळे बिकट परिस्थितीला सामोरे जात होते. वेगळा देश असल्यामुळे आणि चरितार्थाचे साधनच बंद असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या.

तेथील हणमंत चव्हाण, गोरखनाथ पानसकर, नवनाथ साळुंखे, शंकर शेळके व प्रशांत बाबर यांनी खटाव तालुक्‍यातील निमसोडचे सुपुत्र व उत्तर प्रदेश मराठी समाज संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष विश्वनाथ देवकर, कोषाध्यक्ष गजानन पाटील यांच्याशी संपर्क केला.

संघटनेचे संस्थापक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेपाळमधील गलई व्यावसायिकांना मायदेशात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर श्री. देवकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. हा पाठपुरावा करत असताना माजी सभापती संदीप मांडवे, खानापूरचे शिवसेना आमदार अनिल बाबर, संरक्षक माणिकराव पाटील व वरिष्ठ महामंत्री पांडुरंग राऊत यांचेही चांगले सहकार्य झाले.

सर्व पाठपुराव्यानंतर वरिष्ठ स्तरावरून नेपाळमधील भारतीय दूतावासाबरोबर योग्य ती चर्चा होऊन भारतीय गलई व्यावसायिकांना मायदेशात परतण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. 

पहिल्या टप्प्यात सुमारे 260 गलाई बांधव आज मायभूमीकडे यायला निघाले. ते नेपाळची राजधानी काठमांडू येथून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे येतील. तेथून त्यांना गावी आणण्यासाठी सांगलीहून आराम बस रवाना झाल्या आहेत. त्या वाहनांना सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळवून देण्यासाठी आमदार अनिल बाबर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.