...इथं चित्र बघून साकारतात गणेशमूर्ती

राजेश पाटील
Wednesday, 22 July 2020

वेगवेगळ्या साच्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस भरून झटपट गणेशमूर्ती बनविण्याकडे कारागीरांचा कल वाढलेला आहे. त्यातही मनाला भावलेल्या गणेशमूर्तीचे चित्र दाखवून त्यानुसार कोणत्याही साच्याशिवाय शाडू मातीची हुबेहूब मूर्ती साकारणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कारागीरच सध्या ग्रामीण भागात आहेत. 

ढेबेवाडी (जि. सातारा) : मनाला भावलेल्या गणेशमूर्तीचे चित्र दाखवून त्यानुसार कोणत्याही साच्याशिवाय शाडू मातीची हुबेहूब मूर्ती साकारणारी हाडाची कारागिरी आजही ग्रामीण भागात आहेत. या कारागिरांकडून अनेक भाविक प्रतिवर्षी अशा मूर्ती बनवून घेऊन प्रतिष्ठापना करत आहेत. 

गणेशोत्सव जवळ आल्याने सध्या कारागिरांच्या घरी गणेशमूर्तीच्या रंगकामाची एकच धांदल उडाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील वेगवेगळ्या बंधनांमुळे यावर्षी नव्या नियम व अटींच्या चौकटीत हा उत्सव साजरा करावा लागणार असल्याने कारागीरही मूर्तीचा आकार व अन्य बाबतीत वेगवेगळी खबरदारी घेताना दिसून येत आहेत. वेगवेगळ्या साच्यांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस भरून झटपट गणेशमूर्ती बनविण्याकडे कारागीरांचा कल वाढलेला आहे. त्यातही मनाला भावलेल्या गणेशमूर्तीचे चित्र दाखवून त्यानुसार कोणत्याही साच्याशिवाय शाडू मातीची हुबेहूब मूर्ती साकारणारे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत कारागीरच सध्या ग्रामीण भागात आहेत. 

वारुळाच्या मातीपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसपर्यंत झालेल्या मूर्ती निर्मितीच्या प्रवासाचे साक्षीदार असलेले मंद्रुळकोळे खुर्द येथील कुंभारवाड्यातील ज्येष्ठ मूर्तिकार सीताराम कुंभार म्हणाले, ""पूर्वी आम्ही साच्याशिवाय हातानेच गणेशमूर्ती बनवत होतो; परंतु काळाच्या ओघात साच्यासह विविध साधनांमुळे हाताची कला मागे पडली. आता ठराविक जुन्या कारागिरांनाच ती जमते. आपल्याला हवी तशी गणेशमूर्ती चित्र दाखवून बनवून घेण्याकडे अजूनही काही गणेशभक्तांचा कल असून, त्यांच्यासाठी आम्ही धावपळीतूनही आवर्जून वेळ काढून मूर्ती बनवून देत आहोत.'' 

साच्यातून प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती बनवायला एक दिवस लागत असेल, तर चित्र बघून तीच शाडूची मूर्ती हाताने बनवायला तीन दिवस लागतात. आम्हा जुन्या पिढीतील मूर्ती कारागिरांसाठी कलेच्या जुन्या दुनियेत घेऊन जाणारी आणि मनाला आनंद देणारी ही बाब आहे. 

- सीताराम कुंभार, ज्येष्ठ मूर्तिकार, मंद्रुळकोळे खुर्द 

 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सावधान! साताऱ्यात समूह संसर्ग सुरू; 541 गावे कोरोनाबाधित 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara... Ganeshmurti is realized by looking at the pictures here