नको रे बाबा...विलगीकरण कक्षात स्वच्छतेला कुणी धजावेना

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

कक्षात स्वच्छतेसाठी जेवण देण्यासाठी जाणाऱ्यांना समाजातून मिळणाऱ्या वागणुकीमुळे लोक तेथे काम करण्यास धजावत नसल्याची परिस्थिती आहे. वास्तविक योग्य खबरदारी घेतल्यास लोकांना तेथे धोका नसल्याचे सांगण्यात येते. 

कऱ्हाड (जि. सातारा) ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 500 हून अधिक झाली आहे. या बाधितांच्या संपर्क व सहवासातील लोकांसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणी संस्थात्मक विलगीकरण कक्ष केले आहेत. सध्या त्यात मोठ्या संख्येने सहवासीत आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीने या संस्थात्मक विलगीकरण कक्षातील स्वच्छतेच्या कामाला मनुष्यबळच उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. या कक्षातील स्वच्छतेच्या कामाबाबत लोकांमध्ये अनुत्सुकता असल्याचे तळमावले (ता.पाटण) येथील प्रकारावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विलगीकरण कक्षातील स्वच्छता करायची कशी व कुणी, हा प्रशासनास सध्या प्रश्‍न भेडसावत आहे. 

तालुक्‍यात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास महसूल, आरोग्य आणि पोलिस यंत्रणेकडून त्या रुग्णाच्या संपर्कातील लोकांना संस्थात्मक विलगीकरण केले जात आहे. त्यासाठी प्रशासनाने पार्ले येथे दोन, विद्यानगरला पाच, विजयनगर येथे एक व वाठार येथे एक वसतिगृहे संस्थात्मक विलगीकरणासाठी ताब्यात घेतली आहेत. सुमारे 600 लोकांची क्षमता असणारे हे विलगीकरण कक्ष आहेत. बाधिताच्या सहवासातील लोकांना येथे 14 दिवस ठेवले जात आहे. 14 दिवसांनी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यावर त्यांना सोडले जात आहे. या विलगीकरण कक्षात जेवण व स्वच्छतेची जबाबदारी महसूलवर आहे. मात्र, सुरवातीपासूनच विलगीकरण कक्षातील स्वच्छतेला लोक अनुत्सुक असल्याचे दिसून येते. त्यामुळे महसूलच्या अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

संस्थात्मक विलगीकरण कक्षात पॉझिटिव्ह लोक नसले तरी तेथे जाण्याने आपल्यालाही कोरोनाची बाधा होईल, याची भीती अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. तसेच कक्षात स्वच्छतेसाठी जेवण देण्यासाठी जाणाऱ्यांना समाजातून मिळणाऱ्या वागणुकीमुळे लोक तेथे काम करण्यास धजावत नसल्याची परिस्थिती आहे. वास्तविक योग्य खबरदारी घेतल्यास लोकांना तेथे धोका नसल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाकडून स्वच्छतेसाठी जादा पैसे देण्याची तयारी दर्शवूनही लोक काम करण्यास तयार नसल्याने अधिकाऱ्यांपुढे पेच आहे. त्यामुळे सध्या "महसूल'चेच लोक स्वच्छतेचे काम पाहत आहेत. 

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली फवारणी 

दोन दिवसांपूर्वी पाटण तालुक्‍यातील तळमावल्यातील विलगीकरण कक्षातील स्वच्छता करण्यास कोणी धजावत नसल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच पाठीवर पंप घेऊन कक्षात जंतुनाशकाची फवारणी केली. लोकांची भीती दूर होईल, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, लोक भीतीपोटी स्वच्छतेच्या कामास धजावत नसल्याने प्रशासनासमोरही पेच निर्माण झाल्याचे दिसून येते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Get Someone To Clean The Quarantine Room