esakal | खासदार उदयनराजे म्‍हणाले, लोकहिताच्‍या कामांसाठी गरज असेल तेथे मी स्वत: उभा राहीन
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजे

सातारा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करावे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाशी लढा देताना विकासकामांच्या पाठपुराव्यास मर्यादा आल्या असल्या तरी येणाऱ्या काळात कालबद्ध नियोजन करून लोकहिताची कामे मार्गी लावण्याची जबाबदारी अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी पार पाडावी, अशा सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्या. 

खासदार उदयनराजे म्‍हणाले, लोकहिताच्‍या कामांसाठी गरज असेल तेथे मी स्वत: उभा राहीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत आज खासदार उदयनराजे भोसले यांनी विविध विकासकामांच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर महत्त्वाच्या विकासकामांची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये युनियन क्‍लब, यादोगोपाळ पेठ बगीचा, जुन्या पालिका इमारतीतील नियोजित आर्ट गॅलरी, सदाशिव पेठ भाजी मंडई, करंजे येथील नियोजित पाण्याची टाकी आणि नवीन शाळा, माजगावकर माळ घरकुल योजना, हुतात्मा स्मारक, करिअप्पा चौक विकास, नवीन प्रशासकीय इमारत, कर्मवीर हाउसिंग सोसायटीतील मेडिटेशन हॉल आदींचा त्यात समावेश होता. 

यावेळी उदयनराजे म्हणाले, युनियन क्‍लबच्या मागील बाजूस पालिकेची 57 गुंठे मोकळी जागा आहे. या जागेचा चांगला विनियोग करताना क्‍लबशी चर्चा करून नियोजन व्हावे. यादोगोपाळ पेठ येथील (कै.) प्रतापसिंह महाराज ऊर्फ दादा महाराज गार्डनजवळच्या ओढ्याला रिटेनिंग वॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. येथील जागेचा उंच-सखल, चढ-उताराचा फायदा घेऊन लॅन्डस्केपिंगचे डिझाइन तयार करण्यात आलेले आहे. हे गार्डन अस्तित्वात आल्यावर एका देखण्या गार्डनचा लाभ सातारकरांना घेता येईल. या कामाची तातडीने आजच तांत्रिक मंजुरी द्या, अशी सूचना त्यांनी केली.

नगरपरिषदेच्या जुन्या इमारतीत आर्ट गॅलरीच्या डिझाइनची त्यांनी पाहणी केली. याठिकाणी मुख्य इमारतीच्यावर दुसरा मजला वाढवून सुंदर अशी आर्ट गॅलरीची उभारणी करण्यात येणार आहे. जुन्या इमारतीचा सुमारे 20 फुटांचा पुढील भाग रोड वायडिंगमध्ये जाणार असल्याने येथील कॉर्नरचा रस्ताही चांगला रुंद होणार आहे. नागरिकांना विविध प्रदर्शनासाठी एक चांगली उपयोगी वास्तू अस्तित्वात येईल, असे त्यांनी सांगितले. पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या जागेची पाहणी त्यांनी केली. तसेच उर्वरित कामेही जलदगतीने करण्याची सूचना त्यांनी केली. ही कामे करताना गरज असेल तेथे मी स्वत: उभा राहीन. पण, कामे झाली पाहिजेत, 
असेही त्यांनी सांगितले. 
 

loading image