बकरी ईदला रक्तदान; मुस्लीम समाजाने दिला अनोखा संदेश

फिराेज तांबाेळी
रविवार, 2 ऑगस्ट 2020

माण तालुक्‍यातील गोंदवले बुद्रुकमध्ये गेल्या पाच वर्षांपासून मुस्लीम बांधवांतर्फे बकरी ईददिवशी रक्‍तदान शिबीर घेतले जाते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर यंदाही रक्तदान शिबीर घेत जातीय सलोख्याचा संदेश देण्यात आला. 

गोंदवले (जि. सातारा) : जातीने नव्हे तर रक्ताने नाते जोडूया! हा संदेश देत गोंदवले बुद्रुकच्या (ता. माण) मुस्लिम बांधवांनी बकरी ईददिवशी रक्तदानाची परंपरा कायम राखली. सलग पाचव्या वर्षी ईदनिमित्त हा उपक्रम राबवून जातीय सलोखा राखण्याचा प्रयत्न होत असल्याने गोंदवलेकरांचे कौतुक होत आहे. 

येथील मुस्लिम समाज नेहमीच सामाजिक कामात सक्रिय असतो. दुष्काळात मोफत पाणीपुरवठा, मुख्यमंत्री निधीला मदत, हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना मदत, गेल्या वर्षी पूरग्रस्तांना मदत अशी विविध सामाजिक कामे या बांधवांकडून करून सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. रमजान ईदनिमित्त गरजूंना अन्नधान्य वाटप केले जाते. त्याचप्रमाणे बकरी ईदच्या दिवशी रक्तदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. 

यावर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे सर्वच सणांवर बंधने आली आहेत; परंतु या काळात अत्यावश्‍यक असलेल्या रक्तदानाची परंपरा मुस्लिम समाजाने यंदाही कायम ठेवली. ईदची नमाज घरीच अदा केल्यानंतर येथील ग्रामपंचायत सभागृहात सर्वधर्मीयांच्या सहभागाने रक्तदान शिबिर घेण्यात आले. पंचायत समितीचे उपसभापती तानाजीराव कट्टे, सरपंच अश्विनी कट्टे, उपसरपंच संजय माने यांच्या हस्ते शिबिराचे उद्‌घाटन झाले. त्या वेळी दहिवडीचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ, अंगराज कट्टे, प्रवीण भोसले, मुस्लिम समाज अध्यक्ष डॉ. समीर तांबोळी, डॉ. रज्जाक तांबोळी, ग्रामपंचायत सदस्य हाफीजा तांबोळी उपस्थित होते. मायणी वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीचे डॉ. एस. जे. रायबोले व सहकाऱ्यांनी सहकार्य केले. या शिबिरात रक्तदान केलेल्या 25 दात्यांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. 

गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी आम्ही गोंदवलेकर मुस्लिम बांधवांनी बकरी ईद दिवशी रक्तदानाची परंपरा यंदाही कायम राखली आहे. या उपक्रमातून सामाजिक सलोखा राखला जात असल्याने खूप समाधानी आहोत. 

- डॉ. समीर तांबोळी, गोंदवले बुद्रुक 

(संपादन ः संजय साळुंखे) 

 

व्वा..! सवंगड्यांनी थाटला घरगुती राखी उद्योग 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Goat Eid blood donation; A unique message given by the Muslim community