सातारा : जगण्याच्या लढाईतील ‘सुवर्ण’पान

संजयनगरच्या सुवर्णा गोसावींचा मासेमारीतून उदरनिर्वाह; पती, मुलांचे निधन
- सुवर्णा गोसावी,
- सुवर्णा गोसावी, sakal

रेठरे बुद्रुक : पतीपाठोपाठ दोन्ही मुलांचे अकाली निधन झाल्याने तिनं आई-वडिलांचा आधार घेतला. तिथेही तिच्या मागील अडचणींचा फेरा काही केल्या संपला नाही. सख्ख्या भावाला किडनीच्या त्रासाने गाठले. तिथं तिनं भावाला किडनी देवून वाचवलं. त्यातच तिच्या आईचे गेल्यावर्षी निधन झाले. वडील वृध्द, त्यातच भाऊ आजारी अशा कठीण परिस्थितीतही ती जगण्याची लढाई जिद्दीने लढत आहे. रोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय करते. मासे विक्री आणि अंगणवाडी सेविकेच्या कामातून येणाऱ्या बिदागीतून ती रोजच्या गरजा पूर्ण करत जीवनाची ही लढाई लढते आहे. संजयनगर (शेरे) येथील सुवर्णा संजय गोसावी या लढवय्यी महिलेची ही कहाणी.

सुवर्णा यांचे पती व दोन मुलांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांनी आई- वडिलांचा आधार घेतला. मध्यंतरी त्यांचा भाऊ सचिन यास किडनी प्रत्यारोपण करण्याच्या प्रसंगात सुवर्णा यांनी एक किडनी दान देवून वाचवले. भाऊ आजारी असल्याने त्यांना जोखमीची कामे करता येत नाहीत. कोल्हापूर येथे फिरत्या भांडी व्यवसायातून तो आपले कुटुंब चालवत आहे. इकडे सुवर्णा या वडिलांसोबत राहतात. त्या दोघांचा रोजचा खर्च सुवर्णा यांच्यावर अवलंबून आहे.

त्या दररोज सायंकाळी भाचा सुधीरच्या मदतीने नदीत काहीलीतून आत जावून मासे पकडण्यासाठी जाळे सोडतात. रोज सायंकाळी पाच वाजता शेरेतील कृष्णा नदीवर त्या मासे पकडण्याच्या कामास जातात. बांधलेली काहील सोडून ज्या ठिकाणी मासे सापडतात, तेथे काहील वल्हवत जातात. सुधीर गोसावी हा बहिणीचा मुलगा त्यांच्या मदतीस असतो. ते दोघे पहाटे येऊन पाण्यातून जाळे बाहेर काढून सापडलेल्या माशांची विक्री करतात. जाळे पाण्यात सोडणे आणि काढणे ही अवघडीची कामे त्या स्वतः करतात. शेरे स्टेशनवर त्यांचे मासे विक्रीचे दुकान आहे. या व्यवसायातून त्या वडिलांचा दवाखान्याचा खर्च व घरखर्च भागवतात.

त्यांच्या आई सुमन व वडील दाजीराम हे पूर्वीपासून मासेमारी व्यवसाय करायचे. त्यांच्या आईचे गतवर्षी निधन झाले आहे. सुवर्णा या अंथरुणाला खिळून असणाऱ्या वडिलांची सेवा करतात. भावावर उपचार सुरू असल्याने त्यास जास्त हालचाल करता येत नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्या खंबीरपणे पेलत आहेत.

हे काम खूप मेहनतीचे आहे. वाळू उपशामुळे नदी खोल झाली आहे. साठ फूट खोलीच्या नदीतून जाळे उचलताना शारीरिक त्रास होतो. मासे धरण्याचे काम पहाटे करते. जाळे खेचताना शरीराचा सर्व भार पोटावर येतो. त्याचाही त्रास होतो. रोजचा दिवस संघर्षाचा समजून न थकता मी लढायचे ठरवले आहे.

- सुवर्णा गोसावी, संजयनगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com