महामार्गाच्या कामाला मोकळी वाट, गोंदवल्यात व्यापाऱ्यांनी मंदिर परिसर स्वतःहून करून दिला रिकामा

Satara
Satara
Updated on: 

गोंदवले (जि. सातारा) : अनेक दिवसांपासून गावाच्या वेशीवर येऊन थांबलेल्या महामार्गाचे काम हळूहळू पुढे सरकत गोंदवल्यात पोचले. कसलाही विरोध आणि गोंधळ न करता व्यापाऱ्यांनी समाधी मंदिर परिसर स्वतःहून रिकामा करून देत महामार्गाच्या कामाची वाट मोकळी करून दिल्यामुळे या कामाने आता वेग घेतला आहे. कोरोनामुळे बंद असलेले व्यवसाय आता सुरू झाले असतानाच पुन्हा रस्त्याच्या कामामुळे दुकाने बंद झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. 

जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गोंदवल्यातील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिराला लागून पूर्वीच्या सातारा-पंढरपूर मार्गावर आता सातारा-लातूर महामार्ग होत आहे. गावातूनच महामार्ग जात असल्यामुळे रस्त्याखालून जाणाऱ्या गावातील पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्या, गटार व्यवस्था तसेच विजेचे खांबांबाबत मोठा प्रश्न निर्माण झालेला होता. परिणामी गावाच्या वेशीपर्यंत येऊन थांबलेले रस्त्याचे काम पुढे सरकण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. महामार्गामुळे गावाच्या विकासात भर पडणार असल्याने ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली. त्यानंतर आता हे काम पुढे सुरू झाले आहे. 

समाधी मंदिर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या 200 हून अधिक दुकानांचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. या दुकानांवर गावातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद झाले. शिवाय लॉकडाउन झाल्याने दुकानेही बंदच होती. या काळात महामार्गाचे कामदेखील बंदच राहिले. मोठ्या आर्थिक अडचणीत असतानाही आता हे काम सुरू झाल्याने व्यावसायिकांनी तातडीने दुकाने काढून घेत महामार्गाच्या कामासाठी वाट मोकळी करून दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गजबजलेल्या या परिसरामधील दुकाने काढण्यात आल्याने सध्या हा परिसर भकास दिसत असला तरी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने अर्थकारण वाढणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. 


व्यावसायिकांना दाद द्यावी, तितकी थोडीच! 

कोरोनामुळे काही महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आता सुरू होणार आहेत. परंतु, याच दरम्यान महामार्गाचे काम सुरू होत असल्याने पुन्हा काही दिवस दुकाने बंदच ठेवावी लागणार आहेत. आधीच आर्थिक अडचणीत असताना स्वतःहून दुकाने काढून मनाचा मोठेपणा दाखविल्याबद्दल व्यावसायिकांना दाद द्यावी, तितकी थोडीच आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Satara Shahupuri Police Bribe Case
Udayanraje Bhosale Supports Dolby Operators
Sugarcane Agitation
Dhondewadi Ganesh Visarjan Dispute
Marathi News Esakal
www.esakal.com