Satara : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांणसाठी आनंदाची बातमी, दर वधारतोय

कमी कालावधीत हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीन करतात
Soybean
Soybeansakal media

कऱ्हाड : कमी कालावधीत हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी सोयाबीन करतात. बाजारपेठेत आवक वाढली, की दर गडगडतात, हे सूत्र आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून असलेला हा ट्रेंड सोयाबीनच्या बाबतीत बदलला आहे. केंद्र सरकारने सोयाबीनच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याचा आणि आयात होणाऱ्या खाद्यतेलावर अंकुश लावण्यासाठी पामतेल, सोयातेलसह इतर खाद्यतेलांवरील आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोयाबीनची आवक वाढूनही तीन हजार ७१० रुपये क्‍विंटलचा हमीभाव असलेल्या सोयाबीनला सध्या पाच ते साडेपाच हजार रुपये क्विंटलला दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांत सध्या आनंदाचे वातावरण आहे.

दर वर्षी शेतकरी खरीप हंगामात कमी कालावधीत चांगले उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनची लागवड करतात. त्याबरोबर अनेक शेतकरी ऊस किंवा अन्य पिकात आंतरपीक म्हणून सोयाबीन करतात. पावसावरच ही पिके येत असल्याने त्याचा दर वर्षी उताराही मिळतो. सोयाबीनला चांगला भावही असतो. यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन करतात. फेब्रुवारी महिन्यात सोयाबीनच्या किमती सात हजारांवर गेल्या होत्या. त्यामुळे खरीप हंगामातही शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला प्राधान्य दिले. मात्र, यंदा सोयाबीनच्या पिकाला अतिवृष्टीची दृष्ट लागली. राज्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले. दिवाळीसाठी पैशांची गरज असल्याने शेतकऱ्यांनी भिजलेले सोयाबीनची काढणी करून बाजारात विक्रीला नेले. भिजल्याने ते सोयाबीन काळसर पडले. त्यामुळे दिवाळीपूर्वी सोयाबीनचे भाव गडगडले होते. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण होते.

सोयाबीनचे दर गडगडल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि परदेशांतून मोठ्या प्रमाणावर आयात होणाऱ्या खाद्यतेलावर अंकुश लावण्यासाठी केंद्र सरकारने पामतेल, सोयातेल आणि इतर खाद्यतेलांवरील आयात शुल्कात गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक वाढ केली. त्याचबरोबर केंद्र सरकारने सोयाबीनच्या साठ्यावरील मर्यादा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊ लागली आहे. परतीच्या पावसाचा फटका बसल्याने यावर्षी सोयाबीनची उत्पादकता प्रभावित झाली आहे. त्यातच सोयाबीनची मागणीही वाढली आहे. मात्र, त्या प्रमाणात पुरवठा होत नाही. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर गेले आहेत. सोयाबीनचे दर पाच हजारांवरून ५ हजार ३०० रुपये झाले आहेत. नवीन चांगले सोयाबीन बाजारात येत असल्यामुळे सोयाबीनचे भाव सहा हजारांपर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

आठ दिवसांत ७०० रुपयांची दरवाढ

दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली होती. शिवाय दिवसाकाठी दर घटतच होते. त्यामुळे दिवाळीनिमित्त बाजारपेठा बंद होण्यापूर्वी सोयाबीन चार हजार ८०० रुपयांवर आले होते. मात्र, दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कायम सुधारणा झाली आहे. ४ हजार ८०० वर असलेले सोयाबीन आता ५ हजार ५०० रुपयांकडे गेले आहे. पावसामुळे सोयाबीन खराब झाले असतानाही दरात वाढ होत आहे. हे ही यंदाच्या हंगामातील विशेष आहे.

रब्बी हंगामातील पेरण्याही उरकत आल्या आहेत. मागणीनुसार भविष्यातही सोयाबीनचे दर वाढणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेले सोयबीन विकण्याची घाई करू नये. दर वाढल्यानंतर सोयबीन विकावे. त्यातून शेतकऱ्यांना जादाचे चार पैसे मिळतील.

- बी. डी. निंबाळकर, सचिव, बाजार समिती, कऱ्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com