Satara : कोरेगाव तालुक्‍यात झेडपीची रंगीत तालीम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

grampanchayat election

Satara : कोरेगाव तालुक्‍यात झेडपीची रंगीत तालीम

पिंपोडे बुद्रुक : कोरेगाव तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम सुरू झाली आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पिंपोडे बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. थेट जनतेतून निवडले जाणारे सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे नेतेमंडळींनी गृहमंत्र्यांसाठी जोरदार फिल्डिंग लावली असून ऐन थंडीत राजकीय वातावरण तापू लागले आहे.

ग्रामपंचायतींना विविध योजना तसेच विकास निधी थेट येत असल्यामुळे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. सरपंचपद टार्गेट करूनच अनेकजण मैदानात उतरले आहेत. गावकारभारी, पॅनेलप्रमुख व तरुण कार्यकर्त्यांच्या गुप्त बैठकांना वेग आला असून पारावर, चौका-चौकात ''चाय पे चर्चा'' रंगू लागल्या आहेत. सरपंचपद कोणत्या वॉर्डात असेल, त्यासाठी कुणाला उमेदवारी मिळेल आणि कोणत्या गटाची सत्ता येईल, याची ग्रामस्थांमध्ये उत्सुकता आहे.

पॅनेल प्रमुखांकडून विरोधी गटाचा उमेदवार कोण असेल, याचा अंदाज घेऊन कोणाची उमेदवारी निश्चित करायची, हे ठरवले जात आहे. भावी उमेदवारांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदार याद्या गोळा करून कोणत्या वॉर्डात किती मतदार आहेत, पैकी किती जणांचे मतदान आपल्याला मिळेल, याचा चाचपणी सुरू केली आहे.

कधीही नमस्कार न करणारे भावी उमेदवार आता आवर्जून मतदारांना नमस्कार घालून काय चाललंय, बरं हाय का? अशी विचारपूस करत आहेत. अद्यापपर्यंत कोणत्याही गटाने सरपंचपदाचे तसेच वॉर्डाचे उमेदवार जाहीर केले नसून कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. तरीही सात डिसेंबरला अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी चित्र स्पष्ट होणार आहे. थेट सरपंचपद आणि १५ जागांकरिता निवडणूक होणार असून एकूण ६२५८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ३२१६ पुरुष तर ३०४२ स्त्री मतदारांचा समावेश आहे.

...होऊ दे खर्च

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून जनसुविधा, नागरी सुविधा आदी कामे ग्रामपंचायतींना मंजूर झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना विनानिविदा १५ लाख रुपयांपर्यंतची कामे करता येणार असल्याचे ग्रामविकास विभागाने नुकतेच स्पष्ट केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला मिनी मंत्रालयाचे स्वरूप आल्याने ''होऊ दे खर्च'' म्हणत यंदा अनेकजण दंड थोपटून निवडणुकीच्या फडात उतरणार असल्याने इच्छुकांची मनधरणी, रुसवेफुगवे काढण्यात गावकारभाऱ्यांचा कस लागणार, हे नक्की.