लोकसहभागाची किमया... शासननिधीसह लोकवर्गणीतून उभारली आरोग्य उपकेंद्राची इमारत!

संदीप गाडवे 
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

केडंबे गावाची खरी ओळख झाली. ती मुंबई हल्ल्यातील हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे.  हुतात्मा ओंबळे यांच्यामुळे केडंबे गावाकडे आज आदराने पाहिले जाते. येथील ग्रामस्थांनी विविध शासकीय योजनांत लोकसहभागातून चांगले यश संपादन केले आहे. 

केळघर (जि. सातारा) : ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात एखादे चांगले काम करायचे ठरवले, तर निश्‍चित विधायक कामे उभी राहू शकतात. याचा प्रत्यय केडंबे ग्रामस्थांनी आणून दिला आहे. या ग्रामस्थांनी शासकीय निधी लोकसहभाग, श्रमदान व लोकवर्गणी अशा समन्यवयातून गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत अल्पावधीमध्ये उभी केली आहे. 

केडंबे गावाची खरी ओळख झाली. ती मुंबई हल्ल्यातील हुतात्मा तुकाराम ओंबळे यांच्या अतुलनीय पराक्रमामुळे. हुतात्मा ओंबळे यांनी दाखवलेल्या पराक्रमामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला होता. हुतात्मा ओंबळे यांच्यामुळे केडंबे गावाकडे आज आदराने पाहिले जाते. येथील ग्रामस्थांनी विविध शासकीय योजनांत लोकसहभागातून चांगले यश संपादन केले आहे.

गेल्या वर्षी सकाळ रिलीफ फंडातून पाण्याचा गाळ काढण्यासाठी दोन लाख रुपये निधी उपलब्ध झाला होता. नदीतील गाळ काढल्यामुळे आता पाणीसाठा चांगला झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र अपुऱ्या जागेत सुरू होते. त्यामुळे केडंबे, तळोशी, वाळजवाडी, बाहुळे, भुतेघर, बोंडारवाडी, वाहिटे, मुकवली या गावांतील रुग्णांना पुरेसे उपचार मिळत नव्हते. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य एकनाथ ओंबळे यांनी बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चार लाख रुपये निधी उपकेंद्राच्या इमारतीसाठी उपलब्ध करून दिला आहे. गावातील दानशूर व्यक्तींनीही हातभार लावला आहे.

विशेष म्हणजे गावातील ग्रामस्थ गणेश जंगम, विकास ओंबळे यांच्यासह युवक हे लॉकडाउनचा काळ असल्याने स्वतः श्रमदान करून उपकेंद्राच्या कामाला हातभार लावत आहेत. गावातील ग्रामस्थांनी हातभार दिला आहे; पण गावातील सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ही उपकेंद्राच्या कामासाठी खारीचा वाटा उचलला आहे. या इमारतीत वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका, तसेच इतर सर्व कर्मचारी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे परिसरातील दहा गावांतील ग्रामस्थांना वेळेत उपचार मिळणार आहेत. एखादा आजारी रुग्ण केळघर, मेढा येथे उपचारासाठी नेण्यासाठी वेळ व पैसे यांचा अपव्यव होत होता, तोही थांबणार आहे. 

या उपकेंद्राच्या इमारतीच्या बांधकामाची पाहणी नुकतीच वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे, आरोग्य सहायक विशाल रेळेकर, सतीश मर्ढेकर, समुदाय अधिकारी सारिका मुळे यांनी केली व काम दर्जेदार करण्याच्या सूचना केल्या. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Health Sub Center Building Erected By The People With Government Funds