संशयिताला मदत ः फलटणचा पोलिस निलंबित, दोन उपनिरीक्षकांच्या बदल्या

उमेश बांबरे
रविवार, 12 जुलै 2020

बोगस सैन्यभरती प्रकरणातील संशयिताला मदत करणे दोन पोलिस उपनिरीक्षकांसह पोलिस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी फलटण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले, तर दोन पोलिस उपनिरीक्षकांच्या साताऱ्यातील मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या. 

सातारा : बोगस सैन्यभरती प्रकरणातील संशयिताला मदत केल्याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यातील कर्मचारी साहिल झारी याला आज निलंबित करण्यात आले. सातारा शहर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप बनकर व फलटण ग्रामीणचे उपनिरीक्षक उस्मान शेख यांची सातारा पोलिस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ही कारवाई केली. 

सैन्यदल, तसेच नौदलात भरतीचे आमिष दाखवून भाडळी बुद्रुक (ता. फलटण) येथील आकाश काशिनाथ डांगे व बारामतीतील नितीन जाधव यांनी राज्यातील अनेक युवकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला होता. या प्रकरणी 19 जून रोजी आकाश व नितीन यांच्यावर भिगवण (ता. इंदापूर, जि. पुणे) पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी आकाश व नितीनला अटक केली होती. पोलिस तपासात डांगे व जाधवला संदीप बनकर, साहिल झारी व उस्मान शेख यांनी मदत केल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत तेजस्वी सातपुते यांनी आकाशला मदत करणाऱ्या संदीप बनकर, उस्मान शेख यांची साताऱ्यातील पोलिस मुख्यालयात बदली केली, तर साहिल झारीला निलंबित केले. 

अनेक तक्रार अर्जांची परस्पर विल्हेवाट 
बोगस सैन्यभरती प्रकरणी फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात आकाशच्या विरोधात अनेक तक्रार अर्ज आले होते; परंतु बनकर, शेख व झारी यांनी तक्रार अर्जांची बाहेरच विल्हेवाट लावली. जानेवारीतच आकाशचा मित्र सचिन डांगेवर गुन्हा दाखल झाला होता. तपासात आकाशचे नाव समोर आले; परंतु आकाश व टीमने तत्कालीन तपास अधिकाऱ्यांवरच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा ट्रॅप लावून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला होता. अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी आकाश डांगे प्रकरणाचा पर्दाफाश केला. 

(संपादन ः संजय साळुंखे)

 

ऑनलाईन पद्धतीने निधी न काढल्याने 28 कोटी गेले परत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Help to suspect: Phaltan police suspended, two sub-inspectors transferred