जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने राबविला "होम स्कुलिंग" चा प्रयोग

सुनील शेडगे
मंगळवार, 9 जून 2020

"होम स्कूलिंग' संकल्पनेला जगभरात मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे श्री. जाधव यांनी स्पष्ट केले. विशेषतः अमेरिका, इंग्लंड, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आदी देशांनी या संकल्पनेचा स्वीकार केला आहे. आपल्या देशातही याबाबत एक स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात आले आहे. 

सातारा : लॉकडाउनच्या काळाने सर्वच क्षेत्राला तडाखा दिला. शिक्षणाचे क्षेत्रदेखील त्याला अपवाद ठरले नाही. अशा संकटकाळीही माण तालुक्‍यातील एका तंत्रस्नेही शिक्षकाने 70 दिवस "होम स्कूलिंग'ची आगळी संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे.
 
बालाजी जाधव हे या शिक्षकाचे नाव. ते माण तालुक्‍यातील विजयनगर येथील प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. तंत्रस्नेही शिक्षक असा त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या ई-लर्निंगविषयक विविध उपक्रमांची अगदी देशभर चर्चा झाली आहे. "गुगल'ने त्यांचा गौरव केला आहे. लॉकडाउन काळात त्यांनी राबविलेल्या "होम स्कूलिंग'च्या संकल्पनेचे मोठे कौतुक झाले आहे. आपल्या स्वत:च्या घरी पालकांच्या मदतीने मुक्त शिक्षण घेणे म्हणजे होम स्कूलिंग, असे श्री. जाधव सांगतात. या संकल्पनेत विशिष्ट अभ्यासक्रम नसतो, ना विशिष्ट वेळापत्रक. पालक त्यांच्या अन्‌ मुलाच्या सवडीनुसार विविधांगी शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी पुस्तकाची गरज नसते. त्याऐवजी अनुभव, प्रात्यक्षिकास विशेष महत्त्व असते. या संकल्पनेच्या माध्यमातून मुलांना गोष्टी, चित्रकला, कागदकाम, पाककला, बागकाम आदी उपक्रम यशस्वीपणे अन्‌ तितक्‍याच प्रभावीपणे मुलांपर्यंत पोचविता येत असल्याचे त्यांनी नमूद केले. संगणक, लॅपटॉप वा टॅबच्या साह्याने हे शिक्षण मुलांना देता येते.
 
या संकल्पेत वयानुसार मुलांची काही उद्दिष्टे निश्‍चित केली जातात. त्याद्वारे मुलांचे गट बनवितात. संबंधित पालकांनी मुलांना घरी माहिती देणे, अनुभव देणे, प्रात्यक्षिक करणे हे अंतर्भूत असते. महिन्यातून दोन ते तीन वेळा एकत्र येऊन फलनिष्पत्तीविषयी चर्चा केली जाते. गप्पा गोष्टीतून शिक्षण होते. परस्परांना शेअरिंग करतात. त्याच अनुभवातून मुले व पालक समृद्ध होतात, असेही श्री. जाधव यांनी सांगितले. 

जगभरात मोठा प्रतिसाद 

"होम स्कूलिंग' संकल्पनेला जगभरात मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे श्री. जाधव यांनी स्पष्ट केले. विशेषतः अमेरिका, इंग्लंड, आस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा आदी देशांनी या संकल्पनेचा स्वीकार केला आहे. आपल्या देशातही याबाबत एक स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

सोशल डिस्टन्सिंगच्या नियमानुसार दारूची दुकाने सुरू राहू शकतात, तर मंदिरे का नाही?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Home Schooling Project From Balaji Jadhav In Satara District