esakal | आता त्‍यांची होणार महाराष्ट्रवापसी

बोलून बातमी शोधा

मोटारसायकलस्‍वार

बेटी बचाव बेटी पढाव, पाणी वाचवा जीवन वाचवा हा संदेश देत भारतभ्रमण करताना आसाममध्ये अडकलेले प्रवासी विकास शिंदे लवकरच महाराष्ट्रात परतणार आहेत. लॉकडाउन स्थितीमुळे संकटात सापडलेल्या शिंदे यांच्या मदतीला अखेर योगायोगाने महाराष्ट्रातील अधिकारीच धावून आले. 

आता त्‍यांची होणार महाराष्ट्रवापसी
sakal_logo
By
सुनील शेडगे

नागठाणे (जि. सातारा) : विकास शिंदे हे कोरेगाव तालुक्‍यातील वाठार किरोली गावचे. आजपर्यंत सुमारे तीन लाख 37 हजार किलोमीटर प्रवास त्यांनी दुचाकीवरून पूर्ण केला आहे. त्यात तब्बल पाच वेळा त्यांनी भारत भ्रमण केले आहे. पर्यटनाचा छंद जोपासताना ते जनजागृतीचे कार्यही करतात. 

अशातून 18 फेब्रुवारी रोजी ते सहाव्यांदा भारतभ्रमण मोहिमेसाठी वाठार किरोलीतून दुचाकीवर निघाले. त्यानंतर आसाम राज्यातील धेमाजी जिल्ह्यात ते पोचले असताना देशभर "लॉकडाउन' सुरू झाले. अशा परिस्थितीत शिंदे यांच्यासमोर प्रश्नच प्रश्न उभे राहिले. या बिकट प्रसंगी लातूर जिल्ह्यातील रहिवासी असलेले नरसिंग पवार हे तिथे जिल्हाधिकारी असल्याचे शिंदे यांना समजले. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातील कुरोली (माळीवाडी) गावचे धनंजय घनवट हेदेखील आसाममध्ये पोलिस अधीक्षक असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर शिंदे यांनी तत्काळ या दोन्हीही अधिकाऱ्यांची भेट घेतली. 

त्यांनी आर्थिक मदत करताना मॉरिगावचे पोलिस अधीक्षक स्वप्नील ढेका यांना भेटण्यास सांगितले. ढेका यांना भेटताच त्यांनी शिंदे यांची तब्बल 62 दिवस निवासाची, भोजनाची व्यवस्था केली. 

खासदार श्रीनिवास पाटील यांनीही शिंदे यांच्यासाठी सहकार्याचा हात दिला. सामाजिक कार्यकर्ते असलेले दीपक भुजबळ, तसेच अन्य मित्रांचीही मोलाची मदत झाल्याचे शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना नमूद केले. 
आता लॉकडाउनचे निर्बंध शिथिल होत असताना शिंदे यांचा महाराष्ट्रात परत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यातून आठवडाभरात ते गावी परतण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

गेले दोन महिने आयुष्याने जणू सत्त्वपरीक्षाच पाहिली. मात्र महाराष्ट्रीय अन्‌ आसाममधील अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे घराची वाट सुलभ बनली. 
विकास शिंदे, 

वाठार किरोली (ता. कोरेगाव)