बदली बियाणे नको तर पैसे घ्या!, बियाणे महामंडळाने अदा केले 19.12 लाख

हेमंत पवार
Wednesday, 5 August 2020

खरीप हंगामात पेरलेले बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यात 42 शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. पेरलेल्या बियाणांपैकी बहुतांश बियाणे हे बियाणे महामंडळाचेच असून, त्यामध्ये काही खासगी कंपन्यांच्या बियाणांचाही समावेश आहे. 

कऱ्हाड (जि. सातारा) : शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने खरीप हंगामात पेरलेले बियाणेच न उगवल्याच्या अनेक ठिकाणी तक्रारी झाल्या. त्यावर बियाणे महामंडळाने शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुन्हा तेवढेच बियाणे देण्याची तयारी दर्शवली. दरम्यानच्या काळात अनेक शेतकऱ्यांनी हंगाम लांबेल या भीतीने पैशांची जुळणी करून बियाणे पुन्हा विकत घेऊन त्याची पेरणी केली. त्यामुळे महामंडळाचे बियाणे घेतले नाही. त्यांच्यासाठी आता बियाणे महामंडळाने बियाणे नको असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

खरीप हंगामात पेरलेले बियाणे न उगवल्याच्या जिल्ह्यात 42 शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. पेरलेल्या बियाणांपैकी बहुतांश बियाणे हे बियाणे महामंडळाचेच असून, त्यामध्ये काही खासगी कंपन्यांच्या बियाणांचाही समावेश आहे. मात्र, शासनाच्या बियाणे महामंडळाच्याच बियाण्याने दगा दिल्याने शेतकऱ्यांतूनही आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या नशिबी हे संकट आले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. कृषी विभागाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्‍यात तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखील एक समिती करून बियाणे न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामे केले. त्यानंतर बियाणे महामंडळाने शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बियाणे देण्यास सहमती दर्शवली. 

दरम्यान, हंगाम लांबेल या समस्येने शेतकऱ्यांनी पुन्हा ऊसनेपासने, पदरमोड करून पुन्हा नवीन बियाणे घेऊन पेरणी केली. दरम्यान, बियाणे महामंडळाने शेतकऱ्यांकडे बियाणे घ्यावे, असे सांगितल्यावर अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर आता महामंडळाने संबंधित शेतकऱ्यांना बियाणाचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. 

बियाणे महामंडळाची अशी कार्यवाही... 

ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही, अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या. त्यांनी पंचनामे करून त्या बियाणे महामंडळाकडे पाठवल्या. त्यावर बियाणे महामंडळाने शेतकऱ्यांना बियाणे देण्याची तयारी दर्शवली. त्याअंतर्गत बियाणे महामंडळाने तीन हजार 250 क्विंटल बियाणे पेरणीसाठी देण्यात आले आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी स्वखर्चाने दुबार पेरणी केली आहे, त्या शेतकऱ्यांना पैसे देण्याचीही कार्यवाही बियाणे महामंडळाने सुरू केली आहे. त्याअंतर्गत 19 लाख 12 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आले आहेत. 

संपादन : पांडुरंग बर्गे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara If You Dont Want Replacement Seeds Take Money Seed Corporation Paid 19.12 Lakh