पाटण : मोरणा विभागामध्ये अवैध दारूविक्री जोमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध दारूविक्री

पाटण : मोरणा विभागामध्ये अवैध दारूविक्री जोमात

मोरगिरी : पाटण तालुक्यातील मोरणा विभागात अवैध दारूविक्रेते पोलिसांना चकवा देत आहेत. परिसरातील प्रमुख गावांत दारूला ग्राहकांची चांगली मागणी असल्यामुळे, तसेच आर्थिक उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने अनेक व्यक्‍तींनी या व्यवसायात उडी घेतली आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी अवैध दारूविक्रीस आळा घालावा, अशी मागणी महिलांतून होत आहे.

तुळशी विवाहानंतर लग्नसराई सुरू झाली आहे, तर देवदिवाळीनंतर पहिल्या टप्प्यातील गावोगावच्या ग्रामदैवतांच्या यात्रेला सुरुवात झाल्याने गावागावांमध्ये पै पाहुणे नातेवाईक मित्रमंडळी, चाकरमानी यांच्या आगमनाने गावे फुलून गेली आहेत. त्यामुळे या ठिकाणी अवैध दारूविक्री जोमाने सुरू आहे. मद्यपी मद्य प्राशन करून सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्यामुळे रस्त्याने ये- जा करणाऱ्या महिला, कामगार, विद्यार्थी व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तक्रार देण्यास कोणी पुढे येत नसल्यामुळे मद्यपींचा त्रास वाढला आहे.‌ मिळेल त्या ठिकाणी रोजंदारी करून आलेली मजुरी मजूर दारूवर खर्च करीत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत.

हेही वाचा: प्रवीण दरेकरांचा राज ठाकरेंना फोन, 'मुंबई'त भाजप-मनसे सोबत?

कामगार व युवक दारूच्या व्यसनात गुरफटल्यामुळे कौटुंबिक वातावरण, कलह, भांडणात वाढ झाली आहे. दारूची चोरटी विक्री थांबविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर उमटत आहे. दारूविक्री करणाऱ्यांची दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाहीत. यामुळे दारूविक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू

विक्री जोमात सुरू आहे. उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिस त्याकडे काणाडोळा करत आहे.

शंभूराज देसाईंनीच घालावे लक्ष

ग्रामीण भागातील महिला आपला संसार वाचवण्यासाठी धडपडत करताना दिसत आहेत. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. त्याचबरोबर मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क खातेही आहे. त्यांनी खुलेआम सुरू असलेली अवैद्य दारू विक्री वरती कडक कारवाई करून दारू धंद्याला आळा घालावा अशी मागणी महिलांतून होत आहे.

Web Title: Satara Illegal Wine Selling Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SataracrimeWine