तारगाव, किरोली, टकले रस्त्याचा प्रश्‍न अखेर मार्गी

राजेंद्र वाघ 
Sunday, 27 September 2020

तारगाव, किरोली, टकले या गावांना जोडणारा पूर्वी ब्रिटिशकालीन रस्ता होता; परंतु या भागातून लोहमार्ग गेल्यानंतर मागील 70 वर्षांत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला नाही. परिणामी या परिसरातील ऊस व शेतीमालाच्या वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील शेतकरी करत होते.

कोरेगाव (जि. सातारा) : तारगाव, किरोली, टकले (ता. कोरेगाव) या तीन गावांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांतून पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून निधी उपलब्ध झाला आहे. परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून लोकप्रतिनिधी असलेल्या पाटीलद्वयींनी पाठपुरावा केल्याने गेल्या 70 वर्षांतील किचकट, अडचणीच्या व तितक्‍याच जटिल प्रश्नाच्या सोडवणुकीचा मार्ग मोकळा झाला असून, सुमारे दीड हजार एकर क्षेत्रातील उसासह शेतीमालाच्या वाहतुकीची गैरसोय आता दूर होणार आहे. 

तारगाव, किरोली, टकले या गावांना जोडणारा पूर्वी ब्रिटिशकालीन रस्ता होता; परंतु या भागातून लोहमार्ग गेल्यानंतर मागील 70 वर्षांत या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाला नाही. परिणामी या परिसरातील ऊस व शेतीमालाच्या वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी परिसरातील शेतकरी करत होते. दरम्यान, तारगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विकास थोरात यांनी या रस्त्याच्या कामाबाबत पालकमंत्री बाळासाहेब पाटील व खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. या दोन्ही लोकप्रतिनिधींचे प्रयत्न कामी आले असून, खासदार पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून या रस्त्याच्या कामासाठी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून निधी प्राप्त झाला आहे.

प्रारंभिक टप्प्यामध्ये या रस्त्याच्या मोजणीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. तारगाव येथे विकास थोरात यांच्या हस्ते मोजणीच्या कामाचा प्रारंभ झाला. यावेळी दिलीप देशमुख, सुरेश थोरात, दिलीप मोरे, अभिजित घोरपडे, राजकुमार मोरे तसेच टकले गावचे सरपंच प्रशांत घाडगे, दीपक खुटेकर, जयहनुमान घाडगे, राजेश घाडगे, किरोली येथील संजय चव्हाण, रामभाऊ चव्हाण आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर लोहमार्गाच्या खालील तारगाव ते रहिमतपूर हद्दीतील तिन्ही गावांतील अंदाजे दीड हजार एकर बागायती क्षेत्रातील ऊस व शेतीमालाच्या वाहतुकीच्या प्रश्नाची आणि शेतकऱ्यांच्या जटिल समस्येची सोडवणूक होणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला व गेली 70 वर्षे प्रलंबित असलेल्या या रस्त्याचा किचकट व अडचणीचा प्रश्न दोन्ही लोकप्रतिनिधींनी समन्वयाने सोडवल्याबद्दल तारगाव, किरोली, टकले, रहिमतपूरसह परिसरातील गावांतील सर्व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. 

"संमिश्र अर्थव्यवस्था असलेल्या आपल्या खंडप्राय देशात लोकप्रतिनिधींनी शासनामार्फत नकाशावरील ब्रिटिशकालीन रस्ते जलद गतीने खुले करून दिल्यास कोणत्याही ऋतूमध्ये शेतमाल बाजारपेठेपर्यंत जाऊ शकेल. परिणामी महागाई नियंत्रणात राहून शेतकऱ्यांना चार पैसे जादा मिळू शकतील.'' 
-विकास थोरात, तारगाव, ता. कोरेगाव 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara The Issue Of Targaon Kiroli Takle Road Is Finally Resolved