Satara News : साताऱ्यात जैन समाजाचा मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा


Jain community march in Satara, Satara News

Satara News: साताऱ्यात जैन समाजाचा मोर्चा

सातारा : झारखंड राज्य सरकारच्या वन्य व पर्यटन धोरणामुळे जैन धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र असणारे सम्मेद शिखरजींचे पावित्र धोक्यात येत आहे. हे क्षेत्र झारखंड सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले असून, शासनाचा हा निर्णय निषेधार्ह आहे. झारखंड व गुजरात प्रशासनाने जैन धर्मीयांच्या भावनांचा आदर करून योग्य निर्णय घ्यावा, या मागण्यांसाठी सकल जैन समाजाच्या वतीने आज शहरात मोर्चा काढून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना निवेदन देण्यात आले.(Satara News)

झारखंड सरकारच्या धोरणामुळे जैन धर्माच्या अहिंसा तत्त्वाच्या विरोधातील कृत्यांना चालना मिळू शकते. शासनाचा हा निर्णय म्हणजे जैन धर्माच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. जैन धर्मियांचे २० तीर्थंकर भगवान सम्मेद शिखरजींचे पारसनाथ पर्वतराज येथे मोक्षाला गेले होते. श्री सम्मेद शिखरजी हे ठिकाण जैन धर्मियांचे अढळ श्रद्धास्थान आहे. झारखंड सरकारने हे तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

या बाबी जैन धर्माच्या अहिंसा तत्त्वाच्या विरोधात आहेत. सौराष्ट्र, गुजरात येथील शत्रुजय तीर्थावर गेली अनेक दिवस काही असामाजिक तत्त्वांचे उपद्रव वाढले आहेत. मंदिरामध्ये तोडफोड करणे, यात्रेकरूंना त्रास देणे यासारखे प्रकार घडत आहेत. शासनाचा हा निर्णय जैन धर्माच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न असून, हा निर्णय रद्द करावा, अशी मागणी सकल जैन समाजाच्या वतीने करण्यात आली.