Satara : अखेर दहा वर्षे रखडलेल्या भिंतीला मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara News

Satara News: अखेर दहा वर्षे रखडलेल्या भिंतीला मुहूर्त

कऱ्हाड : शहराचे महापुरापासून संरक्षण होण्यासाठी कोयना नदीच्या काठावर गॅबियन पध्दतीची भिंत बांधण्यास अखेर सुरुवात झाली आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी रखडलेल्या कामाला नुकताच प्रारंभ झाला. कोयना नदीपासून कृष्णा व कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमापर्यंत सुमारे एक किलोमीटरपर्यंत भिंत होणार आहे. त्यामुळे कऱ्हाड शहराचे महापुरापासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे. त्यासाठी सुमारे १६ कोटींच्या खर्चाची तरतूद केली आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कोयनाकाठच्या संरक्षक भिंतीसाठी २० कोटींचा निधी मंजूर केला होता. भिंत मंजूर झाल्यानंतर येथील शनिवार पेठेतील कोयनेश्वर मंदिराजवळ तत्कालीन मुख्यमंत्री चव्हाण व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्याचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ती भिंत गॅबियन पध्दतीने करण्याचे ठरले. मात्र, त्यात सुधारणा करण्याच्या सूचना झाल्याने ते काम रखडले.

काँक्रिटच्या भिंतीचा सुमारे १२० कोटींचा सुधारित प्रस्ताव केला होता. निधी नसल्याने काम रखडले. त्यानंतर भाजपच्या सत्ता काळात २०१९ मध्ये शहराला महापुराचा तडाखा बसला. त्यावेळी पुन्हा भिंतीच्या कामाची चर्चा झाली. तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनीही गॅबियन भिंतीबाबत सकारात्मकता दाखवली. निविदा निघाली. मात्र, त्यास प्रतिसाद मिळाला नसल्याने पुन्हा काम रखडलेले. राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भिंतीसाठी नव्याने मार्च २०२२ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू झाली. तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी याबाबत टेंभू प्रकल्प विभागाला सूचना दिल्या. निविदाही अंतिम होऊन ठेकेदार नेमण्यात आला.

तोपर्यंत पावसाळा सुरू झाल्याने काम रखडले. नुकतीच भिंतीच्या कामाला सुरुवात झाली. जुना कोयना पूल ते कोयनेश्वर मंदिरापर्यंत मोजमापे टाकण्यात आली आहेत. जेसीबीने जमीन सपाटीकरण झाले. भिंतीसाठीचे साहित्यही आले आहे.

जुन्या कोयना पुलापासून भुईकोट किल्ल्यापर्यंत एक किलोमीटरची भिंत असणार आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधिस्थळ ते नवीन कृष्णा पुलापर्यंतची भिंत यापूर्वीच पूर्ण झाली आहे. आतापर्यंत कोयना धरणाचा विसर्ग आणि अतिवृष्टीमुळे कोयना नदीच्या महापुरापासून शहराचे जास्त नुकसान झाले आहे. त्यात पायऱ्याखालील भाग, कोयना कॉलनी, दत्त चौक, पाटण कॉलनी, शुक्रवार पेठेत पाणी शहरात शिरते. त्यामुळे तेथे भिंत होणार असल्याने दिलासा मिळणार आहे.

अशी आहेत वैशिष्ट्ये

महापुराचे पाणी शिरणाऱ्या भागाचे संरक्षण

जुना कोयना पूल-प्रीतिसंगम बागेपर्यंत होणार भिंत

भिंतीच्या कामाला दोन वर्षांची मुदत

काँक्रीटपेक्षाही गॅबियनची उत्तम परिणामकारकता

भिंतीला १६ कोटींचा खर्च

टॅग्स :Sataraworker