सातारा : कास पठारावरील दुर्लक्षित पॉइंट सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कास पुष्प पठार

सातारा : कास पठारावरील दुर्लक्षित पॉइंट सुरू

कास : जागतिक वारसास्थळ असलेले कास पठार दुर्मिळ वनस्पतींसाठी जगप्रसिद्ध आहे. पठारावर अनेक प्रेक्षणीय स्थळे असून या पठारावर बारमाही पर्यटन सुरू राहावे, यासाठी सातारा वन विभाग व कास पठार कार्यकारी समिती प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून कास पठारावरील अनेक दुर्लक्षित पॉइंट सुरू करण्यात आले. त्याचा नुकताच प्रारंभ झाला. पर्यटकांचाही त्यास प्रतिसाद मिळत आहे.

सुमारे साडेअठराशे हेक्टरमध्ये असलेले कास पठार रंगीबेरंगी फुले, दुर्मिळ वनस्पतींसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. परंतु, या ठिकाणी मंडपघळ, कुमुदिनी तलाव, प्राचीन गुहा, हंडा घागर, कास पठारावरून दिसणारा निसर्गरम्य परिसर, दाट धुके, छोटे-मोठे धबधबे इत्यादी मनमोहक ठिकाणे पाहण्यासारखी असून पर्यटकांना या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेण्याची संधी कास पठार समिती व वन विभागाने उपलब्ध करून दिली आहे. या पठारावरील पॉइंट पर्यटकांना पाहण्यासाठी खुले केले.

त्याचा प्रारंभ मेढ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. परदेशी, कास पठार समितीचे उपाध्यक्ष दत्तात्रय किर्दत, माजी अध्यक्ष सोमनाथ जाधव, सदस्य गोविंद बादापुरे, ज्ञानेश्वर आखाडे, विजय बादापुरे, सोमनाथ बुढळे, वनरक्षक स्नेहल शिंगाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. पहिल्याच दिवशी पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दुर्लक्षित असणारे पॉइंट पाहून अनेक पर्यटकांनी समाधान व्यक्त केले. कास पठाराचा हंगाम साधारण ऑगस्टअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. हंगाम कालावधीत ज्या ठिकाणी फुले असतात, त्या ठिकाणी मात्र पर्यटकांना सोडण्यात येणार नाही.

कास पठारावरील दुर्लक्षित ठिकाणे पर्यटकांसाठी खुली केली आहेत. फुलांच्या क्षेत्रात पर्यटकांना प्रवेश मिळणार नाही. पर्यटकांनी पर्यावरणाची काळजी घेऊन सर्व पॉइंट्स पाहावेत. तसेच वनसंपतीची हानी होणार नाही, याची काळजी घ्यावी.

-आर. एस. परदेशी, वनपरिक्षेत्राधिकारी, जावळी-मेढा

कास परिसरातील अनेक प्रेक्षणीय स्थळे असून कास परिसर दर्शन ही सेवा लवकरच सुरू करण्याचा समितीचा मानस आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळेल, ही अपेक्षा आहे.

-सोमनाथ जाधव,सदस्य, कास पठार कार्यकारी समिती

Web Title: Satara Kas Plateau Overlooked Point

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..