कोयना धरण पाणासाठ्यात आठ टीएमसीने वाढ, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम

विजय लाड 
Wednesday, 5 August 2020

कोयना धरण ​पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची जलपातळी 2118.11 फूट झाली असून, धरणात 60.28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात 73 टीएमसी पाणीसाठा झाल्यावर धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यात येणार आहे.

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी धो-धो पाऊस पडत आहे. गत 24 तासांत पाणलोट क्षेत्रात झालेल्या "रेकॉर्ड ब्रेक' पावसाने कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात आठ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात 60.18 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणातील पाणीसाठ्याने भरतीकडे प्रयाण केले असून, पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाचा जोर असाच कायम राहिला तर लवकरच कोयना धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयना धरणाचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्‍यता आहे. 

दोन ऑगस्टपासून मुसळधार पावसाचे आगार असणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार पडत आहे. मुसळधार पावसाच्या सरीवर सरी पाणलोट क्षेत्रात कोसळत आहेत. गत 24 तासांत पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडणाऱ्या पावसाचा जोर दुप्पट झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 238, नवजा येथे 299, महाबळेश्वर येथे 308 मिलिमीटर, वलवण येथे 239 मिलिमीटर या "रेकॉर्ड ब्रेक' पावसाची नोंद झाल्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक तब्बल आठ टीएमसीने वाढली आहे. पाणलोट क्षेत्रात सर्वदूर ठिकाणी पावसाची संततधार कायमच आहे. 

पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गत 24 तासांत धरणाच्या पाणीसाठ्यात आठ "टीएमसी'ने वाढ झाली आहे. धरणाची जलपातळी 2118.11 फूट झाली असून, धरणात 60.28 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात 73 टीएमसी पाणीसाठा झाल्यावर धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यात येणार आहे. कोयना प्रकल्पाचे मुख्य अभियंत्यांनी यावर्षी कोयना धरणाची परीचालन सूची मंजूर केली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिला तर लवकरच धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्‍यता आहे. 

गतवर्षीपेक्षा पाण्याची आवक कमीच 

कोयना धरणाची पाहणी करण्यासाठी मे महिन्यात जिल्हाधिकारी शेखर सिंह हे येथे आले होते. यावेळी प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे यांनी धरणात 2133 फूट, 73 टीएमसी पाणीसाठा झाल्यावर प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांनी परीचालन सूचीला मान्यता दिली असल्याचे स्पष्ट केले होते. यामुळे धरणाच्या सहा वक्री दरवाजांना पाणी टेकल्यावर हा प्रयोग होण्याची शक्‍यता आहे. गत 24 तासांत धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 54,830 क्‍युसेक असली तरी गतवर्षी यावेळी पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या मुसळधार पावसाने धरणात एका तासाला येणाऱ्या पाण्याची आवक 1,18,692 क्‍युसेक होती. 

संपादन : पांडुरंग बर्गे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Koyna Dam Water Level Increased By Eight TMC Rainfall In The Catchment Area Continued