
कृष्णा कारखाना निवडणुक: सहकारसह संस्थापक पॅनेलवर गुन्हा दाखल
कऱ्हाड (जि. सातारा) : यशवंतराव मोहिते सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून प्रचाराची सांगता सभा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सहकार व संस्थापक पॅनेलवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वाठार, रेठरे बुद्रुक येथील तलाठ्यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल आहे. (satara-krishna-sugar-factory-election-2021-police-filed-case)
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी लॉकडाउन केले आहे. त्यासाठी त्यांनी आदेश काढला हाेता. त्याचा भंग करून रेठरे बुद्रुक येथे सहकार पॅनेलने प्रचाराची सांगता सभा घेतली. सभेमध्ये सुमारे ८०० ते ९०० लोक होते. तेथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले नाही. तेथील तलाठी विशाल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सभेचे आयोजन करणारे संजय पवार व इंद्रजित कदम (दोघेही रा. रेठरे बुद्रुक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा: बहुचर्चित कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीचे मतदान सुरु
वाठार येथे संस्थापक पॅनेलनेही प्रचाराची सांगता सभा घेतली. त्या सभेत ७०० ते ८०० लोक जमा होते. जमलेल्या लोकांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. जमलेल्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नसल्याची तक्रार तलाठी दादासाहेब कणसे यांनी पोलिसात दिली आहे. त्यानुसार सभेचे आयोजक सुरेश ऊर्फ सुभाष पाटील, सतीश यादव व श्रीकांत देवकर (सर्व रा. वाठार) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.