का धावला तो निष्ठावान अधिकारी 21 किलोमीटर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

सहायक फौजदार वसंत साबळे यांनी आज सेवेच्या अखेरच्या दिवशी सातारा येथील पोलिस मुख्यालय ते कोरेगाव पोलिस ठाणे असे 21 किलोमीटरचे अंतर धावत कापले आणि कर्तव्यावर हजर होऊन पोलिस ठाण्यास "अखेरचा दंडवत' घालत सेवानिवृत्ती स्वीकारली. त्यानंतर वडूथ (ता. सातारा) येथे स्वत:च्या गावी शेतामध्ये कुटुंबीयांसमवेत 36 वृक्षांचे रोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

कोरेगाव (जि. सातारा) : पोलिस विभागामधील 36 वर्षांच्या सेवाकाळात दोन वेळा राष्ट्रपती पदक पटकावणारे राज्यातील एकमेव पोलिस कर्मचारी आणि धावपटू, जलतरणपटू अशी ओळख मिळवणारे व कोरेगाव पोलिस ठाणे येथून सेवानिवृत्त झालेले "साबळे नाना' यांनी यापूर्वी खंडाळा, मेढा, फलटण, कऱ्हाड, सातारा येथे सेवा बजावली आहे.

फलटण येथील कानिफ घोलप याच्यावरील खुनी हल्ला, कऱ्हाड येथील नरेश मस्के खून प्रकरण, बोगस पत्रकार प्रकरण, पैलवान संजय पाटील खून खटला, वाई हत्याकांडातील संशयित संतोष 
पोळ, मांढरदेव दुर्घटना चौकशी, सातारा येथील गोळीबार, खून प्रकरण, महत्त्वाचे गाजलेले गुन्हे, सोनगाव येथील गांज्याची शेती याशिवाय लाखो, कोटींची अपहार प्रकरणे, अवैध पिस्तूल, रिव्हॉल्वर जप्ती, कोरेगाव येथील शंभू बर्गे खून प्रकरण, मोक्का कारवाई, रेवडी, पळशी, कोरेगाव येथील कोटींचे अफरातफरींचे, सावकारी गुन्हे तसेच अनेक दरोडे, चोऱ्या अशा गंभीर, क्‍लिष्ट व गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचे तपास केले आहेत. विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांना न्यायालयातील खटल्याकामी सहकार्य केले आहे.

श्री. साबळे यांनी तपास केलेल्या प्रकरणांतील अनेक आरोपींना शिक्षा झाली आहे. त्यांनी 550 पेक्षा अधिक बक्षिसे व सन्मानपत्रे मिळवली असून, बक्षिसांची रक्कम दोन लाखांहून अधिक आहे. चांगल्या कामगिरीबद्दल पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह, दोन जादा वेतनवाढी, राज्यस्तरीय मानव अधिकार पुरस्काराने त्यांना सन्मानित केले असून, दोन वेळा राष्ट्रपती पदक प्राप्त करणारे ते राज्यातील एकमेव पोलिस कर्मचारी आहेत. त्यांनी आतापर्यंत कबड्डी, व्हॉलिबॉल, स्विमिंग व रनिंगमध्येही नाव उंचावले असून, त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसे मिळवली आहेत.

अरबी समुद्रातील चिवला खाडी येथील जलतरण स्पर्धेत त्यांनी पाच वेळा, तर गोंदिया, अमरावती येथे झालेल्या खुल्या राज्यस्तरीय जलरण स्पर्धेतही भाग घेतला होता. सिकंदराबाद येथील ऑल इंडिया स्विमिंग चॅम्पियनशिमध्ये गोल्ड मेडल पटकावून त्यांनी पोलिस दलाचे नाव उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. 

या पार्श्वभूमीवर आज श्री. साबळे हे त्यांचे सहकारी हवालदार केशव फरांदे, संजय शिर्के, हेमंत मुळीक यांच्यासमवेत धावत जाऊन कोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, सहायक निरीक्षक साळुंखे, कदम व सर्व स्टाफने श्री. साबळे यांचे स्वागत केले आणि सेवानिवृत्तीनिमित्त छोटेखानी सत्काराचा कार्यक्रम घेऊन त्यांना निरोप दिला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara On The Last Day, Vasant Sable Ran 21 km And Showed Up On Duty