
लसीकरणासाठी आवश्यक ती खबरदारी आरोग्य विभागाने घेतलेली आहे. ही लस आल्यामुळे लोकांच्या मनातील भीती कमी होवून त्याचा चांगला परिणाही दिसून येईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यामुळे लोकांच्या मनात असलेली कोरोनाची भीती कमी होईल. त्याचा चांगला परिणाम जनमानसात होईल. हे लसीकरण आरोग्य विभागाच्या सहकार्याने यशस्वीरित्या पूर्ण होईल, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
कोरोनावरील लसीकरणाचा कऱ्हाड तालुक्याचा प्रारंभ गृहराज्यमंत्री देसाई व खासदार श्रीनिवास पाटील यांच्या उपस्थितीत आज येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात प्रयोगशाळा अधिकारी अजय आमने यांना लस देवून झाला. यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, इंद्रजित चव्हाण, प्रांताधिकारी उत्तम दिघे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र जाधव, तहसीलदार अमरदीप वाकडे, डॉ. अशोकराव गुजर, राजेश खराटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, डॉ. दीपक कुऱ्हाडे, उपअभियंता एस. एन. मुंडे, निमा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. कृष्णात शिंदे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष वैभव चव्हाण, जनरलचे अध्यक्ष डॉ. संजय जाधव, रोटरीचे अध्यक्ष गजानन माने, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. शेखर कोगनुळकर, जिल्हा लसीकरण नियंत्रक सागर पिसाळ, डॉ. नागनाथ धर्माधिकारी,अनिता कचरे आदींसह डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.
शुभारंभ! सातारा जिल्ह्यात नऊ ठिकाणी आज 900 जणांना लसीकरण
गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, कोरोनाची लस ही पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील सर्वांना देण्यात येईल. त्यानंतर पोलिस, महसूल विभाग आणि टप्या-टप्याने ती सर्वांना दिली जाईल. त्याचा प्रारंभ आज झाला. त्या लसीकरणासाठी आवश्यक ती खबरदारी आरोग्य विभागाने घेतलेली आहे. ही लस आल्यामुळे लोकांच्या मनातील भीती कमी होईल आणि त्याचा चांगला परिणाही दिसून येईल. आरोग्य विभागाला आवश्यक ते सहकार्य महाविकास आघाडीचे सरकार करेल आणि ही लसीकरण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण होईल.
दूषित पाण्यामुळे 50 जणांना अतिसाराची लागण; आरोग्यवर चाफळच्या नागरिकांचा संताप
खासदार पाटील म्हणाले, कोरोनाच्या लसीकरणाचा प्रारंभ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पालकमंत्र्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी तर कऱ्हाडला गृहराज्यमंत्री देसाई यांच्या हस्ते झाला. कोरोनावरील लस आल्यामुळे लोकांच्या मनातील भीती कमी होणार आहे. चांगल्या गोष्टीचा कमी आणि वाईट गोष्टींचा प्रचार वेगाने होतो. तो या लसीकरणाच्या बाबतीत तसे होवू नये याची सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. कऱ्हाडच्या वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात चांगल्या सुविधा असून त्यामुळे रुग्णाला काही झाल्यास तत्काळ व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्यामुळे कोणी घाबरुन जाण्याचे कारण नाही. वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे यांनी लसीकरणाविषयी माहिती दिली. महेश शिंदे यांनी आभार मानले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे