या गडाच्या पायथ्याला बिबट्याचा मुक्काम

सचिन शिंदे
Wednesday, 5 August 2020

आगाशिवगडाच्या पायथ्यालगतच्या विविध गावांतील काही भाग बिबट्या प्रवण क्षेत्र जाहीर केला आहे. गडाच्या निर्जनस्थळी कोणी फिरू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

कऱ्हाड (जि. सातारा) ः आगाशिवगडाच्या शिखरावर वावरणारा बिबट्याचा गडाच्या पायथ्यालाही मुक्काम आहे. बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने वन विभागाने गडाच्या पायथ्यालगतच्या विविध गावांतील काही भाग बिबट्या प्रवण क्षेत्र जाहीर केला आहे. गडाच्या निर्जनस्थळी कोणी फिरू नये, असेही आवाहन करण्यात आले आहे. ऐतिहासिक गडाच्या पायथ्याला कोणताही गैरप्रकार केल्यास पाच हजारांचा दंड व दोन वर्षे कैदेची शिक्षेची तरतूद आहे, असा इशाराही वन विभागाने दिला आहे. 

आगाशिवला पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व आहे. हिरवाईने नटलेला निसर्गरम्य परिसर पाहण्यासाठी आणि माथ्यावर महादेव मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकाची संख्या मोठी आहे. राज्याच्या विविध भागांतून पर्यटक येथे येतात. गडावर ट्रेकिंगचाही आनंद घेता येतो. डोंगरात विखुरलेल्या ऐतिहासिक बौद्धकालीन लेणी पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. डोंगर माथ्यावरून तालुक्‍याच्या विविध परिसराचे दर्शन घेता येते. त्यामुळे पर्यटकांचा तेथे ओढा वाढला आहे. गडावरील दाट झाडी, वन विभागाने केलेल्या वृक्षारोपणामुळे दाट जंगलही आहे. त्यामुळे गडाच्या शिखर भागात बिबट्याचा वावर आहे. बिबट्यासह त्याची दोन बछडीही फिरत असतात. त्याची माहिती वन विभागासह भागातील ग्रामस्थांनाही आहे. 

अलीकडे काळात शिखरावरील वावर असलेला बिबट्या गडाच्या पायथ्यालगतच्या गावात व रानावनात फिरू लागला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तब्बल दहापेक्षा अधिक गावात धोक्‍यांची घंटा आहे. पायथ्यालगतच्या जखिणवाडी, कोयना वसाहत, आगाशिवनगर, मलकापूरच्या काही भाग, चचेगाव, नांदलापूर, कापील, गोळेश्वर, पाचवड फाटा, आटके टप्पा, काले, नारायणवाडी अशा भागांत बिबट्याचा वावर आढळून आला आहे. त्याचा वन विभाग अभ्यास करत आहे. मात्र, गडाच्या शिखराबरोबरच आता गडाच्या पायथ्यालगतच्या विविध गावांत तो दिसू लागला आहे. त्यातही त्या संबधित गावातील गडालगतचा भाग बिबट्याच्या वावर वाढला आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्या प्रवण क्षेत्र जाहीर करत त्या भागात धोक्‍याचा इशारा देणारे फ्लेक्‍स लावले आहेत. 

- आगाशिवगडाच्या लगतच्या दहा गावांत बिबट्याचा वावर 
- आगाशिवगडच्या शिखरासह पायथ्यालाही बिबट्याचा मुक्काम 
- बिबट्या प्रवण भागात गैरप्रकार केल्यास दंडाची तरतूद 
- पर्यटकांनाही काळजी घेण्याचे आवाहन 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

जावळीतील या दुर्गम गावात सामुहिक शेतीचा नारा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Leopard stops at the foot of this fort