महाराष्ट्राच्या नंदनवनात अशीही घुसमट...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

राज्यात मार्चपासून लॉकडाउनची स्थिती असल्याने येथील सर्वच व्यवहार बंद पडले आहेत. पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला उन्हाळी हंगाम पूर्ण वाया गेल्याने महाबळेश्‍वरकरांचे तर कंबरडेच मोडले आहे. त्याची दखल घेऊन शासनाने सर्वच घटकांना काही सवलतीसह आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे. 

महाबळेश्‍वर, (जि. सातारा) : राज्यात मार्चपासून लॉकडाउनची स्थिती असल्याने येथील सर्वच व्यवहार बंद पडले आहेत. पर्यटनासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला उन्हाळी हंगाम पूर्ण वाया गेल्याने महाबळेश्‍वरकरांचे तर कंबरडेच मोडले आहे.

महाबळेश्वरातील रहिवासी तर पर्यटनावरच अवलंबून असल्‍याने त्‍यांच्‍या स्‍थितीची खल घेऊन शासनाने सर्वच घटकांना काही सवलतीसह आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

श्री. बावळेकर यांनी दिलेल्या निवेदनात, संकलित करात केलेली अन्यायकारक वाढ रद्द करावी, पालिकेने एक हजार स्क्वेअर फुटांपर्यंतची घरपट्टी माफ करावी, उरलेल्या मिळकतींची घरपट्टी जुन्या दराने वसूल करावी, सर्वांचे व्यवसाय बंद असल्याने पाणी बिलांची आकारणी वाणिज्य दराऐवजी घरगुती दरानुसार करावी, त्याचप्रमाणे वीज बिलांची आकारणीही करावी, पालिकेने गाळ्यांचे भाडे माफ करावे, वन विभागानेही ज्या जागा भाडे तत्त्वावर दिल्या आहेत त्यांचे भाडे कमी करून द्यावे, स्ट्रॉबेरीचे पीक शेतातच सडून गेल्याने बळीराजाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना शासनाने आर्थिक पॅकेज जाहीर करावे, असे म्‍हटले आहे.

घोडे व्यावसायिक, टॅक्‍सीचालक व मालक, गाईड व हॉटेल कॅन्व्हसर, चप्पल विक्रेते, टपरीधारक, हातगाडी व्यावसायिक, तापोळा येथील बोटक्‍लब व्यावसायिक, छोटे- मोठे हॉटेल व्यावसायिक आदींसह व्यापारी वर्गाला शासनाने आर्थिक मदत जाहीर करावी, बॅंकांनी कर्जांची मुदत वाढवावी अथवा बॅंक हप्त्यांची रक्कम कमी करावी, तसेच कर्जाची वसुली सक्तीने करू नये अशाही विविध मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. या निवेदनावर शहर व परिसरातील नागरिकांच्या सह्या घेण्यात आल्या आहेत. 

या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींना देण्यात आल्या आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Local Peoples In Maharashtra's Paradise Need Government Help