लॉकडाउनमध्ये मधुमेहींच्या नेत्रपटलावर दुष्परिणाम, अंधत्वाच्या प्रमाणातही वाढ, तज्ञ डॉक्‍टरांचा निष्कर्ष

हेमंत पवार
बुधवार, 1 जुलै 2020

लॉकडाउनच्या काळात काही कारणांमुळे मधुमेह बळावल्यामुळे एचबीएवनसीचे प्रमाणही वाढले. परिणामी "डायबेटिक रेटीनोपॅथी'च्या तीव्रतेतही वाढ झाल्याचे आढळले. "डायबेटिक रेटीनोपॅथी' हा नेत्रविकार जडल्यावर ठराविक कालावधीनंतर लेझर व इंजेक्‍शन उपचारांची आवश्‍यकता असते. 

कऱ्हाड  (जि. सातारा) : कोरोना या संसर्गजन्य आजाराने तीन महिने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. कोरोनाची संसर्गजन्यता, गांभीर्य लक्षात घेऊन मार्चपासून राज्यात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. त्यात मधुमेहींचा व्यायाम बंद झाला. डॉक्‍टरांकडे फेरतपासणीस जाण्यावर बंधने आली. काही औषधे वेळेवर न मिळाल्यामुळे वृद्ध लोकांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार हे आजार बळावले. त्यानंतर गेल्या 20 दिवसांच्या नेत्रतपासणीवरून मधुमेही रुग्णांच्या नेत्रपटलावरील दुष्परिणामांच्या तीव्रतेमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मधुमेहामुळे येणाऱ्या कायमस्वरूपी अंधत्वाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. 

कोरोना या महामारीच्या संकटाने जगाला ग्रासले आहे. त्यामध्ये महाराष्ट्रही मागे नाही. या संसर्गजन्य आजारामुळे सर्वत्र लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. त्यानंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने त्यामध्ये शिथिलता आणण्यात आली. त्यामुळे दवाखानेही सुरू झाले. त्यानंतर लॉकडाउनच्या काळात लोकांच्या आजारात काय-काय बदल झाले, हे आता समोर येऊ लागले आहे. या लॉकडाउन दरम्यान डोळ्यांमध्ये काय बदल झाले, याबाबत माहिती देताना नेत्रतज्ज्ञ डॉ. अस्मिता राहुल फासे म्हणाल्या, ""मागील 15 ते 20 दिवसांत बाह्यरुग्ण विभागात केलेल्या रुग्णांच्या नेत्रतपासणीवरून लॉकडाउनच्या काळात मधुमेही रुग्णांच्या नेत्रपटलावरील दुष्परिणामांच्या तीव्रतेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मधुमेहामुळे येणाऱ्या कायमस्वरूपी अंधत्वाच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. मधुमेहामुळे डोळ्यांच्या नेत्रपटलावर-रेटीनावर होणाऱ्या दुष्परिणामाला "डायबेटिक रेटीनोपॅथी' म्हणतात. त्याची तीव्रता रक्तातील एचबीएवनसीचे प्रमाण यावर अवलंबून असते.'' 

लॉकडाउनच्या काळात काही कारणांमुळे मधुमेह बळावल्यामुळे एचबीएवनसीचे प्रमाणही वाढले. परिणामी "डायबेटिक रेटीनोपॅथी'च्या तीव्रतेतही वाढ झाल्याचे आढळले. "डायबेटिक रेटीनोपॅथी' हा नेत्रविकार जडल्यावर ठराविक कालावधीनंतर लेझर व इंजेक्‍शन उपचारांची आवश्‍यकता असते. ते न केल्यास कायमचे अंधत्व येण्याची शक्‍यता असते किंवा दृष्टीपटलावरील शस्त्रक्रिया करण्याची आवश्‍यकता भासते. कोरोना या आजारामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार तितकेच महत्त्वाचे असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यातच लोकांचा नियमित व्यायाम बंद झाला. डॉक्‍टरांकडे फेरतपासणीस जाण्यावरही बंधने आली. काही औषधेही वेळेवर न मिळाल्यामुळे वृद्ध लोकांचे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार हे आजार बळावले. त्यामुळे या आजारांचे इतर अवयवांवरही मोठे परिणाम झाले आहेत. कोणताही रुग्ण जेव्हा त्याला जास्त त्रास होतो म्हणजे डोळा दुखणे, लाल होणे, मार लागणे असे झाल्यावरच जातो. यापैकी कोणताही त्रास डायबेटिक रेटीनोपॅथी असलेल्या रुग्णास नसतो. त्यामुळे हा आजार रुग्ण गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे नजर कमी झाली की रुग्णालयामध्ये धाव घेतात. त्यामुळे प्रत्येक मधुमेही रुग्णाने डोळ्यांचा काही त्रास असला किंवा नसला तरीही नेत्रतपासणी करणे अत्यंत आवश्‍यक आहे, असेही डॉ. फासे म्हणाल्या. 

संशोधनातील निष्कर्ष... 

गेल्या काही वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या शोधनिबंधातील माहितीनुसार निघालेला निष्कर्ष सांगताना डॉ. फासे म्हणाल्या, "30 दिवसांच्या लॉकडाउननंतर एचबीएवनसीचे प्रमाण 2.26 टक्केने तर 90 दिवसांच्या लॉकडाउननंतर ते 3.68 टक्‍क्‍यांनी वाढलेले आढळले आहे. परिणामी "डायबेटिक रेटीनोपॅथी'ची तीव्रतेतही 30 दिवसांच्या लॉकडाउननंतर 2.9 टक्के तर 90 दिवसांच्या लॉकडाउननंतर 10.3 टक्के वाढल्याचे आढळले. अशीच शक्‍यता आताही दिसत आहे. त्यामुळे मधुमेही रुग्णांमधील अंधत्वाचे प्रमाणही वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यासाठी मधुमेही रुग्णांनी तो आटोक्‍यात ठेवण्यासोबतच नेत्रतपासणी करणेही अत्यंत आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Lockdown Affects Diabetic Retinas, Increases Blindness, Expert Findings