लॉकडाउनमध्ये "टाइमपास'करता करता डांबीचा डोंगर हिरवाईने नटू लागला

Satara
Satara

गोंदवले (जि. सातारा) : लॉकडाउनमुळे "टाइमपास' करायला गेले. पण, त्यातूनच निसर्गप्रेम वाढत गेले अन्‌ तरुणाईने पर्यावरणाच्या संतुलनासाठी प्रयत्न सुरू केले. गोंदवले आणि किरकसालमधील युवकांच्या प्रयत्नातून दुर्लक्षित असणारा डांबीचा डोंगर आता हिरवाईने नटू लागला आहे. 

गोंदवल्याच्या पश्‍चिमेला आणि आदर्शगाव किरकसालच्या कुरणात डांबीचा डोंगर आहे. माण व खटावची सीमा असणाऱ्या या डोंगराकडे फारसे कुणाचे लक्ष नव्हते. किरकसाल ग्रामस्थांनी जैवविविधता टिकविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि या डोंगर परिसरातील वनराजी वाचविण्यासाठीचा श्रीगणेशा झाला. त्यात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाउन या कामासाठी अधिक प्रेरणादायी ठरला. लॉकडाउनमुळे दिवसभर घरात थांबून कंटाळलेली गोंदवल्यातील तरुणाई फेरफटका मारण्यासाठी चार किलो मीटरवरच्या या डोंगरात भटकू लागली. पुढे डोंगरावर ट्रेकिंग सुरू झाले. लॉकडाउन शिथिल होताच अल्पावधीतच रोज सकाळी आणि संध्याकाळी येथे व्यायामासाठी आबालवृद्ध वाढू लागले. 

दरम्यान, किरकसालकरांकडून डोंगरमाथ्यावरील मंदिराजवळ वडाचे झाड लावण्यात आले अन्‌ मग वृक्षारोपणाच्या संकल्पनेने जन्म घेतला. डोंगर व परिसरात फिरायला जाणाऱ्यांसह ग्रामस्थांनी रोपांच्या लागवडीसाठी खड्डे खोदले. आता येथे येणाऱ्यांकडून उत्स्फूर्तपणे वृक्षारोपण करण्यात येत आहे. त्यामध्ये चिंच, आंबा, सीताफळ, रामफळ, करंज, रीठा, बेल, जांभूळ, करवंद, बेल, पेरू तसेच राज्य पुष्प जारुळ या झाडांचा समावेश आहे. किरकसालच्या अमोल काटकर यांनी रोपांची उपलब्धता करून दिली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने पाच झाडे लावून त्यांची जोपासना करण्याचा संकल्पच आता येथे येणाऱ्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता डांबीचा डोंगर हिरवाईने नटू लागला आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित या डोंगरावर हिरवाई होणार असल्यामुळे आता माण व खटाव तालुक्‍यांच्या सीमेवर पर्यटनासाठी संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, यासाठी शासनाकडून प्रयत्न होण्याची आवश्‍यकता आहे.'' 


""लॉकडाउनच्या काळात डांबीच्या डोंगरावर ट्रेकिंग सुरू केले. परंतु, डोंगरावर आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची कल्पना सुचली आणि वृक्षारोपण केले. या उपक्रमाची व्याप्ती वाढत असल्याचे खूप समाधान मिळत आहे.'' 
-अभिलाष भोसले, गोंदवले बुद्रुक 


संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com