Satara Loksabha Election : साताऱ्यासाठी महायुतीत रस्सीखेच; नरेंद्र पाटील पुन्हा शड्डू ठोकण्यास तयार

शिवसेनेला (शिंदे गट) उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
Satara Loksabha Election
Satara Loksabha ElectionSAkal

Satara News : सातारा लोकसभा मतदारसंघावर अजितदादा गटाने नुकताच दावा केल्यानंतर भाजप, शिवसेना (शिंदे गट) ही या मतदारसंघावर दावा करण्यास सरसावले आहेत. त्यासाठी पक्षाची ताकद, मिळालेली मतांची आकडेवारी सांगत मतदारसंघावर हक्क दाखविला जात आहे.

त्यामुळे साहजिकच महायुतीमध्ये या मतदारसंघासाठी आत्तापासून रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपचे नरेंद्र पाटील यांनी आज निवडणूक लढविण्यासाठी तयार असल्याचे नागपुरात सांगितले, तर शिवसेनेला (शिंदे गट) उमेदवारी मिळावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

‘सातारा शिवसेनेची हक्काची मतपेटी’

सातारा लोकसभा मतदारसंघात १९९६ मध्ये हिंदुराव निंबाळकर हे शिवसेनेतून खासदार झाले होते. त्यानंतर एकदा अपवाद वगळता ही जागा नेहमीच शिवसेनेकडे राहिली आहे. गतवेळी चार लाखांहून अधिक मते शिवसेनेच्या उमेदवाराला मिळाली होती.

त्यामुळे शिवसेनेकडे हक्काची मतपेटी असल्याने ही जागा शिवसेनेलाच द्यावी, अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे शिवसेनेचे (शिंदे गट) संपर्क नेते विजय शिवतारे यांनी सांगितले.

येथील शासकीय विश्रामगृहात श्री. शिवतारे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, रणजितसिंह भोसले, एकनाथ ओंबाळे, शारदा जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. शिवतारे म्हणाले, ‘‘सातारा लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार असावा, अशी मागणी कार्यकर्त्यांची आहे. सध्याचे खासदार राष्ट्रवादीचे असले तरीही राष्ट्रवादीची ताकद विभागली गेली आहे. मात्र, शिवसेनेची ताकद मोठी आहे.

शिवसेनेकडे हक्काची मतपेटी असल्याने ही जागा शिवसेनेलाच घ्यावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बैठकीत मागणी करणार आहे. ही जागा कोणालाही मिळाली, तरीही येथे महायुतीचा उमेदवारच विजयी होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे यश मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. स्थानिक व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मोठ बांधण्यासाठी आम्ही काम करत आहोत. सभासद नोंदणी कार्यक्रमही राबवत आहोत. जिल्ह्यात दोन हजार ९९८ बूथ असून, प्रत्येक बूथवर शिवसेनेचा बूथप्रमुख नेमणार आहे, असेही शिवतारे यांनी सांगितले.

लोकसभेसाठी उमेदवारी मागण्याचा सर्वांना अधिकार आहे. मात्र, आमच्या तिन्ही पक्षांच्या वतीने (महायुती) ज्याला उमेदवारी दिली जाईल, त्यास शिवसेना शंभर टक्के निवडून आणेल.

- विजय शिवतारे, माजी मंत्री (शिंदे गट)

Satara Loksabha Election
Satara : मराठा विद्यार्थ्यांच्या खात्यावर साडेपाच कोटी ; ‘सारथी’ची कार्यवाही

नरेंद्र पाटील पुन्हा शड्डू ठोकण्यास तयार

सातारा लोकसभा मतदारसंघासाठी भाजप, शिंदे गट शिवसेना व अजित पवार यांची राष्ट्रवादी या महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे नेते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष,

माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी ही जागा भाजपचीच असून, भाजपने उमेदवारी दिल्यास आपण निवडणूक लढविण्यास तयार आहे, असे सांगून आणखी एक बॉम्ब टाकला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महामंडळाच्या लोगोचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी नागपूर विधान भवन परिसरात श्री. पाटील यांच्याशी ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने संवाद साधला.

Satara Loksabha Election
Satara News : भाजप नेत्याच्या 'या' मागणीला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा 'ग्रीन सिग्नल'

यावेळी सातारा लोकसभेच्या जागेबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले हे भाजपमधून निवडणूक लढणार होते; पण त्यांचे मनपरिवर्तन झाल्याने त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार सातारा लोकसभेसाठी मला उमेदवारी दिली गेली.

त्या निवडणुकीत मी उदयनराजे भोसले यांचे आव्हान स्वीकारून त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. या निवडणुकीत मला साडेतीन ते चार लाख मते मिळाली. पराभवानंतरही मी श्री. फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आजही भाजपमध्ये काम करत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये जय्यत तयारी केली आहे, त्यामुळेही निवडणूक जिंकण्यासाठी मला पक्ष व देवेंद्र फडणवीस उमेदवारी देतील. संधी मिळाली तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही मला साथ मिळेल.

- नरेंद्र पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com