सातारा : खटाव तालुक्यात वाढतोय लम्पी

पहिल्या टप्प्यातील मदत आठवडाभरात होणार उपलब्ध
animal
animal

सातारा : जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आठ तालुक्यांतील जनावरांमध्ये लम्पीचा सर्वाधिक प्रादुर्भाव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. लम्पीमुळे पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना आठवडाभरात आर्थिक मदत मिळणार आहे. पुढील टप्प्यात उर्वरित पशुधनांसाठी मदत दिली जाणार आहे.

गेल्या महिनाभरापासून लम्पी आजार राज्यभरात थैमान घालत आहे. जिल्ह्यात कऱ्हाड, फलटण, सातारा, खटाव, कोरेगाव, पाटण, माण, खंडाळा या तालुक्यांमध्ये लम्पी रोगाचा संसर्ग वाढत आहे. हा आजार रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. लसीकरणही वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात ६४ जनावरांवर उपचार करून ती बरी झाली असून, सद्यःस्थितीत २४२ जनावरांवर उपचार करण्यात येत आहेत. लम्पी आजाराच्या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरातील २७५ गावांमधील जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, आठ तालुक्यांतील ५१ गावांमध्ये २० हून अधिक जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजअखेर ३८५ हून अधिक जनावरांना लम्पी आजाराची बाधा झाली आहे. जिल्ह्यात ९५ हजार ९८८ जनावरांचे लसीकरण केले आहे.

दरम्यान, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लम्पी आजाराने राज्यातील जळगाव जिल्ह्यात शिरकाव केला. त्यानंतर हळूहळू राज्यभरात या आजाराचा फैलाव वाढत जाऊन जनावरे दगावणाऱ्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसल्याने त्यांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने गेल्या चार दिवसांपूर्वी बैठक घेऊन लम्पी आजाराने पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर केली आहे. त्यानुसार जिल्हास्तरावर शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

पंचनामा महत्त्वाचा...

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. पशुधनाचा मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना, ग्रामपंचायतीत त्याबाबतची माहिती द्यायची आहे. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील यांच्या उपस्थितीत मृत जनावराचा पंचनामा होईल. पंचनाम्यात ‘लम्पी आजाराने मृत्यू’ असा उल्लेख आवश्‍यक आहे. त्यानंतर पंचनामा तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयाकडे जाणार असून, त्या कार्यालयाने तत्काळ हा पंचनामा जिल्हास्तरीय समितीत सादर करायचा आहे. तेथे पंचनाम्याच्या कागदपत्रांची तपासणी होऊन आर्थिक साहाय्य मंजुरीसाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांकडे जाणार आहे. या प्रक्रियेनंतर आठवडाभरात आर्थिक मदत मिळणार आहे.

जिल्ह्यात लम्पी आजाराचा आठ तालुक्यांत संसर्ग आहे. याआजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना आठवडाभरात आर्थिक मदत दिली जाणार आहे. मृत जनावरांची आकडेवारी समोर येईल, त्यानुसार पुढील टप्प्यात उर्वरित पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य केले जाईल.

- डॉ. संजय शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सातारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com