घनदाट जंगलात, दऱ्याखोऱ्यांत महावितरणचे जिगरबाज काम

घनदाट जंगलात, दऱ्याखोऱ्यांत महावितरणचे जिगरबाज काम

सातारा  : 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्याने जावळी खोऱ्यातील घनदाट जंगल व दऱ्याखोऱ्यांत जमीनदोस्त झालेली वीजयंत्रणा उभारण्यासाठी अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीत महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्यांनी चार दिवस यशस्वी झुंज देत सातारा जिल्ह्यातील प्रतापगडसह अतिदुर्गम 16 गावे (ता. महाबळेश्वर) प्रकाशमान केली आहेत.

महाबळेश्वर येथील महावितरणच्या वेण्णालेक उपकेंद्रातून प्रतापगड उच्चदाब 22 केव्ही क्षमतेच्या वीजवाहिनीद्वारे सह्याद्री डोंगररांगेत असलेल्या अतिदुर्गम जावळी खोऱ्यातील प्रतापगड, मेटतळे, वाडा कुंभरोशी, शिरवली, कासरूड, हतलोट, बिरवाडी, डिरमणी, जावळी, दुधोशी, फरोशी, पारसोंड, प्रतापगड आदी 16 गावांतील सुमारे 1250 वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. सुमारे 70 किलोमीटर लांबीची ही वीजवाहिनी जावळी खोऱ्यातील दऱ्या व किर्र अरण्यामधून गेलेली आहे. महाबळेश्वरपासून निघालेल्या या वाहिनीचे शेवटचे टोक प्रतापगडावर आहे.

तीन जूनला आलेल्या 'निसर्ग' चक्रीवादळाच्या तडाख्याने विविध ठिकाणी मोठी झाडे व फांद्या कोसळल्याने या उच्चदाब वीजवाहिनीचे आठ वीजखांब तसेच अडीच किलोमीटर वीजतारा जमीनदोस्त झाल्या. तसेच वाहिनीशी संलग्न 26 लघुदाबाचे वीजखांब कोसळले. त्यामुळे वाडा कुंभरोशी, मेटतळे, प्रतापगडसह 16 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. वादळाचा प्रथमच असा तडाखा बसला. चक्रीवादळाच्या दिवशी महाबळेश्वर तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. मात्र दुसऱ्या दिवशी तालुक्यात तब्बल सरासरी 162 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे महावितरणला वीजयंत्रणा दुरुस्तीचे काम दुसऱ्या दिवशीही सुरु करता आले नाही. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी चक्रीवादळानंतर सातारा जिल्ह्यातील वीजयंत्रणेचा आढावा घेतला. यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी तसेच प्रतापगडसह 16 गावांचा वीजपुरवठा लवकर सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याप्रमाणे वाईचे कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर यांनी या भागात भेटी देऊन वीजयंत्रणेच्या उभारणीच्या कामाला सुरवात केली.

अतिशय घनदाट जंगलात दोन ठिकाणी कोसळलेल्या ठिकाणी नवीन वीजखांब नेणे जिकरीचे व अतिशय मुश्कील होते. वनविभागाची परवानगी घेऊन मेटतळे, कुंभरोशी, जावळी या गावांतील ग्रामस्थांच्या मदतीने नवीन दोन वीजखांब नेण्यात आले. यासह मेटतळे परिसरातील आणखी तीन वीजखांब व वीजतारांची यंत्रणा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले. दुसरीकडे दुधोशीजवळ अत्यंत खोल दरीमधील तीन वीजखांब पडल्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. तेथेही नवीन वीजखांब रोवण्याचे व वीजतारा ओढण्याचे काम सुरु करण्यात आले.

डोंगरदऱ्यांच्या निसरड्या वाटा, चिखल व पावसाची रिपरिप, ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश नाही, सर्वदूर धुके अशा स्थितीत काम करताना तोल गेल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता होती. परंतु हे सर्व धोके दूर ठेऊन महावितरणचे जिगरबाज उपकार्यकारी अभियंता चेन्नास्वामी रेड्डी, सहाय्यक अभियंता सनी पवार, अमोल गिरमे (वाई), बाळासाहेब चोरमले तसेच जनमित्र नितीन मोरे, लखन नावीलकर, अमित मोरे, रमेश मोरे, दिनेश जाधव, मयूर गायकवाड यांच्यासह कंत्राटदारांचे 15 कर्मचारी व सुमारे 40 ग्रामस्थ यांनी सलग चार दिवस वीजयंत्रणा उभारण्याचे काम केले. दररोज सकाळी साडे सात ते रात्री वाहन किंवा मोबाईलच्या प्रकाशझोतात साडे पर्यंत अविश्रांत काम सुरु होते. साताऱ्याचे प्रभारी अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने यांनी नवीन वीजखांब, इतर साहित्य पाठविण्याचे तत्परतेने काम केले. तर वाडा कुंभरोशीच्या ग्रामस्थांनी महावितरणची झुंज पाहून कर्मचाऱ्यांच्या जेवणाची एक वेळ व्यवस्था केली होती.

चार दिवसांच्या कालावधीत उच्चदाबाचे सर्वच आठ वीजखांब उभारल्यानंतर प्रतापगड, वाडा कुंभरोशी, मेटतळे आदींसह सर्वच 16 गावांचा वीजपुरवठा टप्प्या टप्प्याने सुरळीत करण्यात आला. चक्रीवादळामुळे कोसळलेले लघुदाबाचे 26 खांब उभारण्याचे काम सध्या सुरु आहे. हे लवकरच काम पूर्ण झाल्यानंतर दोन-तीन घरांच्या वाड्या-वस्त्यांचा वीजपुरवठा सुरु करण्यात येणार आहे. महावितरणचे अभियंते तसेच वीजयंत्रणा उभारण्यासाठी कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांचे बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी कौतुक करुन सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आहे.

हे वागणं बरं नव्हं : पृथ्वीराज चव्हाणांचा संरक्षणमंत्र्यांना टाेला

नगराध्यक्षा गांधारी : कलंक पुसण्यासाठी राजीनामा द्यावा : अशाेक माेने कडाडले

हद्दीच्या वादात मुकवली माची अंधारात! 

कोरोनामुक्त आईच्या कुशीत नवजात बाळ विसावले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com