esakal | माणदेशाचे दुदैव...लाखोंची ग्रंथसंपदा पोत्यात पडून!, कोठे हे वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

मोही ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज ही ग्रंथसंपदा तरुण विद्यार्थी, ग्रामस्थांच्या हातात न पडता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पोत्यात अक्षरशः धूळखात पडली आहे. 

माणदेशाचे दुदैव...लाखोंची ग्रंथसंपदा पोत्यात पडून!, कोठे हे वाचा...

sakal_logo
By
धनंजय कावडे

शिखर शिंगणापूर (जि. सातारा) : मोही (ता. माण) येथील ग्रंथालय-वाचनालय केवळ जागेअभावी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात अक्षरशः पोत्यात धूळखात पडलेले आहे. 

मोही हे गाव सुमारे पाच हजार लोकवस्तीचे आहे. या गावाने देश, राज्याला अनेक अधिकारी, सैनिक, ऑलिंपिकपटू, उपमहाराष्ट्र केसरी, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू, समाजसेवक दिले आहेत. या गावातील सुशिक्षित तरुण गेल्या काही वर्षांत स्पर्धा परीक्षांची तयारी करताना दिसत आहेत. काही तरुण लोकसेवा आयोगाची परीक्षा देत आहेत. त्यांना गावात काही पुस्तके उपलब्ध व्हावीत, त्यातून त्यांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी गावात ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना पुढे आली. 

अखेर गावात ग्रंथालय सुरू करण्याचा निर्णय ग्रामसभेत ठराव करून घेण्यात आला. या ठरावानुसार ग्रामपंचायतीच्या अधिपत्याखाली वाचनालय सुरू करण्याचे ठरले. या ग्रंथालयासाठी सुमारे सव्वालाख रुपये किमतीची पुस्तके खरेदी करण्यात आली. ग्रंथालयासाठी अनेकांनी उत्स्फूर्त लोकवर्गणी दिली तर गावातील युवा प्रतिष्ठानने ग्रंथालयासाठी खुर्च्या उपलब्ध करून दिल्या. मात्र, मोही ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज ही ग्रंथसंपदा तरुण विद्यार्थी, ग्रामस्थांच्या हातात न पडता ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पोत्यात अक्षरशः धूळखात पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने ग्रंथालयासाठी जागा उपलब्ध करून हे ग्रंथालय त्वरित सुरू करण्याची आग्रही मागणी माजी सैनिक धनाजी देवकर यांनी केली आहे. 

ग्रंथसंपदा पोत्यात पडून असल्यामुळे गावगाडा हाकणाऱ्या नेते मंडळींचे गावाच्या विकासकामांकडे दुर्लक्ष असल्याचे दिसते आहे. गावात राजकारणी डावपेच सुरू असल्यामुळे सुशिक्षित तरुणांना उपयुक्त ठरणारे हे अनमोल ग्रंथालय पोत्यात धूळखात तर पडले नाही ना, अशी शंका ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने त्वरित जागा उपलब्ध करून पोत्यातील ग्रंथालय प्रत्यक्षात सुरू करावे, अशी मागणी युवा प्रतिष्ठानसह व मोही ग्रामस्थांतून केली जात आहे. 


""मोही गावामध्ये नव्याने सुरू करावयाच्या ग्रंथालय-वाचनालयाच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागलेला आहे. तेव्हा थोड्याच दिवसांत हे ग्रंथालय-वाचनालय सुरू करण्याचा मानस आहे.'' 

-वैशाली नेटके, सरपंच, मोही ग्रामपंचायत 

संपादन : पांडुरंग बर्गे