"माणदेशी'ने अडवले 925 टीसीएम पाणी, आठ वर्षांत 17 सिमेंट बंधाऱ्यांची उभारणी

Satara
Satara

म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍याच्या पूर्व भागात माणदेशी फाउंडेशनने गेल्या आठ वर्षांत 17 सिमेंट बंधारे उभारले असून, यंदा या बंधाऱ्यांच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने पावसाचे वाहून जाणारे 925 टीसीएम पाणी अडविण्यात यश आलेले आहे. सध्या हे सर्व बंधारे भरून वाहू लागल्याची माहिती माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा चेतना सिन्हा व माणदेशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांनी दिली. 

म्हसवडनजीकच्या ढोकमोड येथील ओढ्यावर "माणदेशी'ने एचएसबीसी बॅंकेच्या सहयोगातून 17 व्या सिमेंट बंधाऱ्याचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले असून हा बंधारादेखील भरून वाहू लागल्याने या बंधाऱ्यातील पाणीसाठ्याचे जलपूजन नुकतेच करण्यात आले आहे. या बंधाऱ्यांतील पाण्याचा फायदा प्रत्येक बंधाऱ्यालगतच्या शेतकऱ्यांच्या 537 विहिरींना झाला आहे. सुमारे 600 ते 650 विंधन विहिरींतील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झालेली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आटोक्‍यात आणण्यासही मदत झाली व शेतकऱ्यांचे एक हजार 426 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. याचा फायदा तीन हजार 551 शेतकरी कुटुंबांना व 36 हजार 800 लोकसंख्येस झालेला आहे. 

बंधारे बांधण्याच्या संकल्पनेविषयी माहिती देताना चेतना सिन्हा म्हणाल्या, ""बंधार बांधण्यापूर्वी या भागातील पाणीटंचाईची समस्या गंभीर होती. ऐन पावसाळ्यात पिण्याइतपतही पाणी उपलब्ध होत नसे. जनावरांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. शेतीचीही अशीच अवस्था होती. सन 2012-13 मध्ये या भागात तीव्र दुष्काळाचे संकट आले. शेतकऱ्यांनी पाणी व चारा टंचाईस त्रागून दुभती व किमती जनावरे विक्रीचा सपाटा लावला. शेतकऱ्यांनी जनावरे विकली तर पुढे काय? हा प्रश्न पडला व आम्ही माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमाने शासनाच्या अनुदानाविना राज्यात पहिली जनावरांची छावणी सुरू केली. या छावणीत आश्रयास आलेली सुमारे 14 ते 15 हजारांच्या संख्येने जनावरे व त्यासोबत केवळ पाण्याची सुविधा तीही खात्रीशीरपणे छावणीतच असल्याची वस्तुस्थिती पाहून शेतकरी बांधवांची कुटुंबेच मुक्कामी आलेली होती. त्यातून शेतकऱ्यांच्या समस्या समजल्या. त्यामुळे म्हसवड भागातील पाझर तलावांसह नालाबांधांमधील गाळ उपसला. त्यानंतर गंगोती, पुळकोटी, शिरताव या गावांकडेच्या ओढ्यांवर साखळी पध्दतीने सिमेंट बंधारे उभारले. त्यानंतर माण नदीच्या पात्रातही शेंबडेवस्ती व म्हसवड येथील यात्रा पटांगण येथे बंधारे उभारणी केली तसेच वडजाई, दिवड येथील करंज व ढोकमोडा ओढ्यावरही बंधारे उभारून म्हसवड शहराच्या चारी दिशेस बंधाऱ्यांच्या साह्याने पाणी अडविल्यामुळे या परिसरातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यास यश मिळाले. याचा फायदा शेतकरी बांधवांना निश्‍चितपणे झालेला आहे. 

"माणदेशी'शी ने उभारलेल्या सर्व बंधाऱ्यांची निगा राखण्यासाठी बंधारा पाणी समित्याही स्थापन करण्यात आल्या. बंधारा परिसरामध्ये वृक्षारोपण करून वनसंपदा वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विशेष बाब म्हणजे हे 17 बंधारे उभारण्यात एचएसईबी बॅंक, क्रेडिट स्विस, जनकल्याण चॅरिटेबल ट्रस्ट, आनंद प्रोजेक्‍ट, बृहद्‌ भारतीय समाज, एस. आर. हळबे (केबीसी) व संबंधित बंधाऱ्यांच्या लगतच्या शेतकरी बांधवांसह ग्रामस्थांनीही वेळोवेळी मोलाचे योगदान दिल्यामुळे हे सर्व शक्‍य झाले. 

""सर्व बंधाऱ्यांची वेळेत व उत्कृष्टरित्या बांधकामे पूर्ण करून घेण्यासाठी विजय सिन्हा, प्रभात सिन्हा व माणदेशी फाउंडेशनच्या कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी व माणदेशी परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतल्यामुळे आज या भागातील संबंधित सर्व शेतकरी समाधानी आहेत. "माणदेशी'ने केलेल्या या कार्याचे देश, विदेशातही कौतुक होत असल्याचा मला सार्थ अभिमान वाटत आहे.'' 

-श्रीमती चेतना सिन्हा, संस्थापिका, माणदेशी फाउंडेशन 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com