Satara : ‘मराठी विश्वकोश’साठी इमारत उभारणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Deepak Kesarkar

Satara : ‘मराठी विश्वकोश’साठी इमारत उभारणार

वाई : मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या येथील कार्यालयासाठी नव्याने अद्ययावत इमारत उभारण्यात येणार असून, त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरीव तरतूद करणार असल्याची ग्वाही शालेय शिक्षण व भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

येथील मराठी विश्वकोश कार्यालयासाठी इमारतीसाठी जागेची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी मंडळाचे सहसचिव शामकांत देवरे, पुरुषोत्तम जाधव, विकास शिंदे, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे आदी उपस्थित होते.

श्री. केसरकर म्हणाले, ‘‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सुरू केलेले विश्वकोश निर्मितीचे कार्य हा मराठी भाषेचा ठेवा आहे. तो जिवंत ठेवण्यासाठी व तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे स्मारक म्हणून विश्वकोशाची अद्ययावत व परिपूर्ण अशी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे. यामध्ये मंडळाचे प्रशासकीय कार्यालय, भव्य ग्रंथालय, अँफी थिएटर, याठिकाणी येणाऱ्या विद्वान, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी यांना येथे बसून विश्वकोश पाहता आणि वाचता येईल,

यासाठी सुसज्ज अभ्यासिका अशा विविध सोयी सुविधा दीड एकर जागेत उपलब्ध केल्या जातील. यासाठी एका संस्थेने व खासगी व्यक्तीने रस्त्यालगतची जागा भाड्याने अथवा विकत देण्याची तयारी दर्शवली आहे. या जागेची पाहणी करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.’’

केंद्र शासनाकडून नव्याने शैक्षणिक धोरण राबविण्यात येत आहे. त्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षणासाठी मराठी भाषेला प्राधान्य दिले आहे. इंग्रजीला पर्यायी मराठी शब्द उपलब्ध करण्याचे सामर्थ्य फक्त विश्वकोशात आहे. यामुळे पुढील काही महिन्यांत हे काम मार्गी लावण्यात येईल. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये अनेक प्रगल्भ शिक्षक असून,

त्यांच्या ज्ञानाचा फायदा राज्यातील सर्व शिक्षकांना व्हावा, यासाठी शैक्षणिक स्तरावर एक मासिक सुरू करण्यात आले आहे. यामध्ये राज्यातील शाळांमधून राबविण्यात येणारे विविध प्रकल्प राज्यस्तरातील राज्यातील शिक्षकांना व शिक्षणाच्या अभ्यासकांना उपलब्ध होतील.

बाळासाहेब कोणाची खासगी प्रॉपर्टी नाहीत

बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती नसून तो एक विचार आहे. बाळासाहेबांची शिवसेना ही त्यांचे स्वाभिमानी विचार जपणारी आहे. त्यामुळे आमच्या गटालाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार आहे. बाळासाहेब ठाकरे ही कोणाची खासगी प्रॉपर्टी नव्हती, तर ते महाराष्ट्राचे व संपूर्ण देशाचे होते. आम्ही युती म्हणून निवडून आलो आहोत.

मात्र, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचे विचार सोडून राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती केली. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तुमच्या इतकीच मलाही उत्सुकता आहे. आमच्या पक्षाकडे नव्वद आमदार, खासदार आहेत. त्यांच्या मताचा विचार न्यायालय, निवडणूक आयोग ही करेल, असेही केसरकर म्हणाले.