Covid- 19 Effect : संभाव्य धोका टाळण्यासाठी पुढील सात दिवस शाळेला दिली सुटी

Covid- 19 Effect : संभाव्य धोका टाळण्यासाठी पुढील सात दिवस शाळेला दिली सुटी

दहिवडी (जि. सातारा) : कोरोनाच्या स्फोटाने दहिवडी शहर हादरले. प्रथमच शहरात एका दिवसात तब्बल 45 नवीन कोरोनाबाधित सापडले. माण तालुका व दहिवडी शहर सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनापासून थोडे दूरच होते. मात्र, जसजसे निर्बंध हटू लागले अन्‌ सर्व चित्रच पालटले. हळूहळू बाधितांची संख्या तालुक्‍यात व शहरात वाढू लागली. गेल्या काही दिवसांत शहरातील परिस्थिती बिकट झाली. बाधिताच्या संख्येने शंभरी गाठल्याने प्रशासन सतर्क झाले. वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली; पण हे सगळे कुचकामी ठरल्याचे आजच्या अहवालाने समोर आले. आजचा शहरातील बाधितांचा आकडा पाहून सर्वच जण हादरून गेले. एका दिवसात 45 बाधित हा आकडा झोप उडवणारा आहे. 

संपूर्ण शहर कंटेनमेंट झोन करण्यात आले आहे; पण त्यात असलेली थोडीफार ढिलाई बाधितांचा आकडा ऐकून तत्काळ दूर करण्यासाठी पावले उचलण्यात आली. प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी संपूर्ण शहरात फिरून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिस उपअधीक्षक डॉ. निलेश देशमुख यांनीही पोलिस प्रशासनाला सतर्क केले. नगरपंचायतीचे नगराध्यक्ष धनाजी जाधव व मुख्याधिकारी अवधूत कुंभार यांनी नगरपंचायतीची सर्व यंत्रणा कार्यान्वित केली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना सूचना नव्हे, तर आदेश देण्यात आले आहेत. कुणीही घराबाहेर पडू नये. ज्यांना थंडी तापाची लक्षणे आहेत. त्यांनी तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. अन्यथा अशा व्यक्तींवर साथरोग प्रतिबंधक कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कडक कायदेशीर व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
 
शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत कोणालाही शहरात प्रवेश दिला जाणार नाही, तसेच शहराबाहेर जाऊ दिले जाणार नाही. प्रत्येक ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. खांडसरी चौक-मायणी चौक-फलटण चौक या रस्त्याने फक्त लांबच्या पल्ल्याच्या वाहनांसाठी परवानगी देण्यात आली आहे. 

"शहरातील कोरोनाबाधितांची संख्या व प्रसाराचा वेग चिंताजनक आहे. त्यामुळे थोडाफार संशय आला अथवा लक्षणे आढळली, तर तत्काळ कोरोना चाचणी करून घ्यावी. सूचना व नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 
- शैलेश सूर्यवंशी, प्रांताधिकारी. 

Happy Birthday His Highness : उदयनराजेंना काेणाकडून कसले Gift हवे आहे 

दरम्यान रयत शिक्षण संस्थेचे मलवडी (ता. माण) येथील त्रिंबकराव काळे विद्यालय 2 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घेतला आहे.

या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कोरोनाबाधित झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्रिंबकराव काळे विद्यालय मलवडी ही माण तालुक्याच्या पश्चिम भागातील मोठी शाळा आहे. या शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात. साधारण 750 विद्यार्थी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी साधारण 25 अशी येथील स्थिती आहे. मलवडी व परिसरातील भांडवली, शिंदी खुर्द, शिरवली, श्रीपालवण, परकंदी, आंधळी, कासारवाडी, सत्रेवाडी आदी ठिकाणांहून विद्यार्थी या शाळेत शिकण्यासाठी येतात. शासन निर्णयानुसार शाळा सुरु झाल्यापासून शाळा सुरळित सुरु होती.

मात्र सोमवार 22 फेब्रुवारी रोजी या शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कोरोनाबाधित सापडल्याने विद्यार्थी व पालकांच्यात खळबळ माजली. त्यानंतर मंगळवारी तातडीने शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच पालकांची शाळेत बैठक घेण्यात आली. या बैठकीस सरपंच दादासाहेब जगदाळे, उपसरपंच जगदीश मगर, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रेखा मगर, रसूल मुलाणी आदी ग्रामस्थ व शिक्षक उपस्थित होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तसेच संभाव्य धोका टाळण्यासाठी एकमुखाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2 मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.

यासोबतच मलवडी बसस्थानक परिसरातील वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीने सर्व हाॅटेल व दुकानांची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात अशी निर्धारित केली आहे. तसेच सर्व व्यापारी बांधवांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक कोरोनाबाधित सापडले असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

जितेंद्र जगदाळे, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती.


"कोणत्याही विद्यार्थ्याला अथवा त्यांच्या पालकांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ मलवडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून चाचणी करुन घ्यावी."

दादासाहेब जगदाळे, सरपंच.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com