माथाडी कामगारांनाही हवे विमा संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

अत्यावश्‍यक सेवेतील घटकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देण्यात येणारे विमा संरक्षण राज्यातील माथाडी कामगार व सुरक्षा रक्षकांनाही लागू करावे, अशी मागणी पुढे आली आहे. 

ढेबेवाडी (जि. सातारा) : इतर घटकांबरोबरच माथाडी कामगारसुद्धा अत्यावश्‍यक सेवेत काम करतात. गॅस वितरण व कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामाबरोबरच औषधांची चढउतार, रेल्वे धक्‍क्‍यावर अन्नधान्य पोचवणे आदी कामे ते करत असतात. अत्यावश्‍यक सेवा बजावताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमाकवच- सानुग्रह साहाय्य लागू करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 29 मे रोजी निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामध्ये माथाडी कामगार व सुरक्षा रक्षकांचाही समावेश होणे आवश्‍यक आहे. 

याबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधितांकडे प्रत्यक्ष भेटून मागणी केल्याची माहिती येथे दिली. 

श्री. पाटील म्हणाले, ""मालाचे लोडिंग, अनलोडिंग, थापी, वाराई व त्या अनुषंगिक कामे करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या माथाडी मंडळात नोंदीत असलेल्या माथाडी, वारणार, मापाडी व पालावाला, महिला कामगार या घटकांचा समावेश अत्यावश्‍यक घटक यादीत केला जावा व त्यांना विमा कवच- सानुग्रह साहाय्य लागू करण्यात यावे. या घटकांना रेल्वे प्रवास करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना प्रत्यक्ष भेटून, तसेच निवेदन देऊन केली आहे. 

शासनाचा आदेश पाळून बाजारपेठांमधून नागरिकांना अन्न- धान्य, भाजीपाला व इतर जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा होण्याकरिता माथाडी कामगार व सुरक्षा रक्षक कोरोनाच्या संकटातही जीव मुठीत घेऊन कर्तव्य बजावत आहेत. यामध्ये कोरोनाची लागण होऊन काही सुरक्षा रक्षक व माथाडी कामगारांचा मृत्यूही झालेला आहे. कोरोनाची लागण झाल्यास औषधोपचाराच्या खर्चाची किंवा दुर्दैवाने मृत्यू आल्यास संबंधितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे ती प्राधान्याने करण्यात यावी, यासाठी आम्ही शासनाकडे आग्रही आहोत.

""राज्यातील माथाडी कामगार व सुरक्षारक्षकांना विमा कवच- सानुग्रह साहाय्य लागू केल्यास ते बिनधास्तपणे आपले कर्तव्य बजावतील. शासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय जाहीर करावा.'' 
- नरेंद्र पाटील, माथाडी कामगार नेते. 
 

सातारा : जिल्हा रुग्णालयात मशिनअभावी मंदावतोय कोरोना तपासणीचा वेग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mathadi Workers Also Want Insurance Protection