मायणीला लवकरच समूह पक्षी संवर्धनाचा दर्जा, कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षकांची ग्वाही

Satara
Satara

कलेढोण (जि. सातारा) : मायणीतील ब्रिटिशकालीन तलावाशेजारी असलेले पक्षी आश्रयस्थान, कानकात्रे व सूर्याचीवाडी तलाव, येरळवाडी मध्यम प्रकल्पात दाखल होणारे देशी-विदेशी पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी "समूह पक्षी सवंर्धन राखीव' असे नामकरण करून त्याचा दर्जा वाढविण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करणार असल्याचे कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्‍लेमेट बेन यांनी सांगितले. 

मायणी येथे मायणी, येरळवाडी, सूर्याचीवाडी व कानकात्रे ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी, निसर्ग प्रेमींच्या प्राथमिक बैठकीत डॉ. क्‍लेमेट बोलत होते. या वेळी विभागीय वनाधिकारी सागर गवते, उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा, सहावनसंरक्षक संजीवन चव्हाण, वनक्षेत्रपाल शीतल पुंदे, काश्‍मीर शिंदे, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, मानद वन्यजीव रक्षक सुनील भोईटे, पक्षीमित्र, पर्यावरण प्रेमी उपस्थित होते. डॉ. बेन म्हणाले, ""मायणी परिसरातील तलावात देशी- विदेशी पक्षी दर वर्षी दाखल होत असल्याने पर्यटकही मोठ्या प्रमाणात दाखल होतात. मात्र, या परिसराला शासनाचा कोणताच दर्जा नाही. त्यामुळे येथील ठिकाणाचा विकास करण्यासाठी शासनाचा निधी मिळण्यात अडचण येत आहे. त्यासाठी वनविभागाकडून ग्रामस्थ, पर्यावरण प्रेमी, पक्षीप्रेमींना सोबत घेऊन "पक्षी संवर्धन राखीव'चा प्रस्ताव आम्ही शासनास सादर करत आहोत. त्यामुळे येथील पर्यटनास चालना मिळणार असून, गावाच्या वैभवात भर पडणार आहे.''

डॉ. हाडा म्हणाले, ""ग्रामस्थांनी "अतिथी देवो भव' ही संकल्पना अंलबजावणी करत पर्यटनाला चालना द्यायला हवी. त्यासाठी वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. वनविभाग व स्थानिक ग्रामस्थांना घेऊन वनसंरक्षण संयुक्त समिती स्थापन करून मायणी पक्षी समूह संवर्धन राखीवला चालना मिळेल. त्यातून गावाचा विकास होण्यास मदत होणार आहे.'' या वेळी डॉ. येळगावकर यांनी शासकीय कामात बाधा न आणता मायणी ग्रामस्थ वनविभागास सहकार्य करतील. त्यासाठी लागणारी मदत मायणीकर ग्रामस्थ करतील, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

या वेळी पक्षीमित्र डॉ. श्‍यामसुंदर मिरजकर, प्रगती पाटील, सुधीर सुकाळे, दादासाहेब कचरे, पोपट मिंड, अंकुश चव्हाण, राजू कचरे, सूरज पाटील आदींनी आपली मते मांडली. सुरवातीस सुनील भोईटे यांनी पक्षी संवर्धनाची गरज याविषयी माहिती दिली. कार्यक्रमास जलसंपदा, पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


"सकाळ'चा पाठपुरावा... 

मायणी, कानकात्रे, सूर्याचीवाडी व येरळवाडी येथील पक्ष्यांचा आधिवास, पक्षीनोंदी, निरीक्षणे "सकाळ'ने वेळोवेळी नोंदवली होती. दुष्काळी भागातील पक्षी संवर्धनासाठी "सकाळ'ने केलेल्या या प्रयत्नास यश येत असल्याने पक्षिमित्रांनी "सकाळ'ला धन्यवाद दिले. 

संपादन : पांडुरंग बर्गे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com