साताऱ्याच्या नगराध्यक्षांची 'या'साठी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितली परवानगी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

काही नगरसेवकांनी कोरोनासाठी पालिकेने केलेल्या खर्चावरच आक्षेप घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभा घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास सभेत कोरोनाच्या खर्चावरून वाद होण्याची चिन्हे आहेत.
 

सातारा : पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यासाठी नगराध्यक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून शाहू कलामंदिरात ही सभा घेतली जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी या सभेला परवानगी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभेत कोरोनासाठी पालिकेने केलेला खर्च, चतुर्थ वार्षिक पाहणी, घरपट्टी आकारणी, कोरोना फायटर आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देणे आदी विषय चर्चेला घेतले जाणार आहेत. 

कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असला तरी सोशल डिस्टन्सिंग पाळून सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे सातारा पालिकेनेही आगामी काळात घ्यायच्या विविध निर्णयांसाठी सर्वसाधारण सभा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी नगराध्यक्षा माधवी कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सभा घेण्याची परवानगी मागितली आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी कोणत्याही सभा, कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. पण, व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे सभा घेण्यास परवानगी मिळू शकते. सातारा पालिकेला सभा घेण्यासाठी शाहू कलामंदिर हे योग्य ठिकाण आहे. तेथे 40 नगरसेवक सोशल डिस्टन्सिंग पाळून योग्य प्रकारे सभा घेऊ शकतात. 
पण, जिल्हाधिकारी परवानगी देणार का, हा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. 

सभेस परवानगी मिळाल्यास सभेत कोरोनासाठी पालिकेने किती खर्च केला, कोणत्या प्रभागात मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले, कोणत्या नाही, यावरून वाद रंगणार आहे. तसेच चतुर्थ वार्षिक पाहणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडण्याऐवजी उत्पन्न आहे एवढेच राहणार आहे. तसेच घरपट्टीची आकारणी झालेली नाही. त्यामुळे सध्या जुन्याच दराने घरपट्टीची बिले नागरिकांना पाठविली जात आहेत. याशिवाय कोराना फायटर आरोग्य कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याबाबतचा निर्णयही या सभेत घेतला जाणार आहे. काही नगरसेवकांनी कोरोनासाठी पालिकेने केलेल्या खर्चावरच आक्षेप घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभा घेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यास सभेत कोरोनाच्या खर्चावरून वाद होण्याची चिन्हे आहेत.

झेडपीची सभा 12 जूनला होणार 

काही ठिकाणी सर्वसाधारण सभा या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न झाला आहे. सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण येत्या 12 जूनला ऑडिटोरियममध्ये होणार आहे. तेथे सोशल डिस्टन्सिंग पाळून ही सभा घेणे सहज शक्‍य आहे. पण, जिल्हा परिषद सदस्यच सभेला आले नाहीत तर मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सभा घेण्याची तयारी जिल्हा परिषदेने केली आहे. त्याप्रमाणे सातारा पालिकेची सभा शाहू कलामंदिरात झाल्यास तेथेही सोशल डिस्टन्सिंग चांगल्या प्रकारे पाळता येणार आहे, अन्यथा व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधेचाही वापर करता येणार आहे.

...तरीही सातारी कंदी पेढ्याची चवच न्यारी

निर्बंध उठले खरे.... पण सलून व्यावसायिकच कात्रीत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Mayour Asked Permission To Collector For Conducting General Body Meeting