Satara : साताऱ्यात राष्‍ट्रवादी, रिपाइंचे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 रिपाइंच्‍या वतीने निषेध

Satara : साताऱ्यात राष्‍ट्रवादी, रिपाइंचे आंदोलन

सातारा : पैठण येथील कार्यक्रमादरम्‍यान महात्‍मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या शैक्षणिक कामकाजाविषयीचे वादग्रस्‍त वक्‍तव्‍य करणाऱ्या उच्‍च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा आज येथे राष्‍ट्रवादी काँग्रेस, तसेच रिपाइंच्‍या वतीने निषेध करण्‍यात आला. आंदोलनावेळी श्री. पाटील यांच्‍या प्रतिमेस जोडे मारण्‍याबरोबरच त्‍यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी करून रिपाइंने निषेध रॅली काढली. याच मागणीसाठी दादासाहेब ओव्‍हाळ यांच्‍या नेतृत्‍वाखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्‍यात आला.

पैठण येथील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी महात्‍मा फुले, कर्मवीर पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शाळा सुरू करताना तत्‍कालीन शासनाने अनुदान दिले नाही, तर त्‍यांनी लोकांकडे भीक मागितली आणि शाळा सुरू केल्‍याचे वक्‍तव्‍य केले होते. आज सकाळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळ्यापाशी रिपाइंचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा झाले. त्‍यांनी सातारा बंदची हाक देत चंद्रकांत पाटील यांचा निषेध केला. यानंतर त्‍यांनी शहरातून निषेध फेरी काढली. आंदोलनाची माहिती मिळताच सातारा शहर पोलिस ठाण्‍याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी किशोर गालफाडे, अप्पा तुपेंसह इतर आंदोलकांशी चर्चा केली. या वेळी आंदोलकांनी चंद्रकांत पाटील यांच्‍यावर गुन्‍हा दाखल करून घेण्‍याची मागणी केली. या आंदोलनामुळे साताऱ्यातील बाजारपेठ काहीकाळ बंद पडली होती.

याच वक्‍तव्‍याचा निषेध करण्‍यासाठी राष्‍ट्रवादी काँग्रेसनेही आंदोलन केले. आंदोलनावेळी राष्‍ट्रवादीच्‍या पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्‍या प्रतिमेस जोडे मारत त्‍यांनी केलेल्‍या वक्‍तव्‍याचा निषेध केला. या वेळी राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष सुनील माने, दीपक पवार, तेजस शिंदे, बाळासाहेब सोळस्‍कर, राजकुमार पाटील, रमेश उबाळे, युवराज पवार, समिंद्रा जाधव, संजना जगदाळे, स्‍मिता देशमुख, अतुल शिंदे, शफीक शेख, नागेश साळुंखे व इतर पदाधिकारी उपस्‍थित होते. या वेळी सुनील माने यांनी चंद्रकांत पाटील यांच्‍यासह भाजपवर सडकून टीका केली.

याच अनुषंगाने रिपाइं (ए) चे राज्‍य उपाध्‍यक्ष दादासाहेब ओव्‍हाळ यांच्‍या नेतृत्‍वाखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयावर गाढव मोर्चा काढण्‍यात आला. गाढवाला चंद्रकांत पाटील यांच्‍या प्रतिमेचा मुखवटा घालत काढलेल्‍या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्‍यात आली. मोर्चात कैलास जोगदंड, पूजा बनसोडे, सोमनाथ धोत्रे, राजेंद्र होटकर यांच्‍यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. दादासाहेब ओव्‍हाळ यांनी या वेळी चंद्रकांत पाटील यांचा निषेध करत भाजपवर टीका केली. मोर्चेकऱ्यांच्‍या वतीने जिल्‍हाधिकारी कार्यालयास निवेदन देण्‍यात आले आहे.