सातारा : कचरा संकलनासाठी पालिकेचा आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

satara

सातारा : कचरा संकलनासाठी पालिकेचा आराखडा

सातारा : शहरातील खंडित झालेले कचरा संकलनाचे काम येत्‍या दोन ते तीन दिवसांत सुरळीत होण्‍याची शक्‍यता आहे. त्‍यासाठी पालिकेच्‍या आरोग्‍य विभागाने पुढाकार घेतला आहे. हद्दवाढीनंतर तयार झालेल्‍या नवीन प्रभाग रचनेसह रस्‍ते, परिसर सफाई आणि कचरा संकलन करण्‍याचा आराखडा पालिका तयार करत आहे. त्यासाठी ६२ गाड्या आणि १७० कर्मचारी तैनात करण्‍यात येणार आहेत.

शहरातील रस्‍ते सफाई, कचरा संकलनाचे काम पालिकेच्‍या वतीने ठेकेदारास दिले होते. या ठेक्‍याची मुदत संपल्‍यानंतर पालिकेने त्‍यासाठीची फेरप्रक्रिया राबवली. ही प्रक्रिया पूर्ण झाल्‍यानंतर या कामाचा ठेका नव्‍याने पुणे येथील भगवते कंपनीस दिला. त्यानुसार सध्‍या उपलब्‍ध मनुष्‍यबळ, वाहने आणि इतर तांत्रिक बाबींची पडताळणी करत कचरा संकलन शहर आणि विस्‍तारित भागात सुरू आहे. काम सुरू असले तरी, त्रुटींमुळे प्रत्‍येक घरात कचऱ्याचे ढीग साचून आहेत. या ठेक्‍यात मोठ्या प्रमाणात स्‍थानिक हितसंबंध, हस्‍तक्षेप आणि स्‍थानिक अदृ‍श्‍‍य शक्तीही गुंतल्‍याची पालिकेत चर्चा सुरू आहे.

साचलेल्‍या कचऱ्याबाबतची सार्वत्रिक ओरड झाल्‍यानंतर अनेक ठिकाणी घंटागाड्या पाठविण्‍यात आल्‍या. मात्र, त्‍यात सातत्‍य नसल्‍याने नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नागरिकांनी जाहीर नाराजी तसेच निवेदने पालिकेस दिल्‍यानंतर आरोग्‍य विभागाने रस्‍ते सफाई, कचरा संकलनाचे वेळापत्रक तयार करण्‍यास सुरुवात केली आहे. यासाठी हद्दवाढीनंतर नव्‍याने तयार झालेल्‍या प्रभागरचना मध्‍यस्‍थानी ठेवली आहे. प्रभागरचना, त्‍याठिकाणची लोकसंख्‍या, प्रभागाचा विस्‍तार आदी बाबी लक्षात घेऊन कचरा संकलनाचा आराखडा तयार करण्‍यात येत आहे. सफाई, संकलनासाठी तयार करण्‍यात येणाऱ्या पथकांकडे शाहूपुरी, विलासपूरसह इतर विस्‍तारित भागांची जास्‍तीची जबाबदारी सोपविण्‍यात येणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक अंतिम टप्‍प्‍यात असून येत्‍या दोन ते तीन दिवसांत त्‍याची प्रत्‍यक्ष अंमलबजावणी होईल, अशी माहिती आरोग्‍य निरीक्षक सागर बडेकर यांनी दिली.

वाहने, कर्मचाऱ्यांची नेमणूक

कचरा संकलनासाठी पालिकेच्‍या वतीने ४० छोट्या घंटागाड्या, १२ ट्रॅक्‍टर आणि इतर १० वाहने अशी एकूण ६२ वाहने वापरण्‍यात येणार आहेत. कचरा संकलनासाठी वापरण्‍यात येणाऱ्या छोट्या घंटागाडीवर चालक, सहायक असे ८०, ट्रॅक्‍टरवर १ चालक आणि ४ सहा‍यक आणि दुसऱ्या दहा वाहनांवर एक चालक, एक सहा‍यक असे २० तसेच सफाईसाठी ३० कर्मचारी नेमण्‍यात येणार आहेत.

Web Title: Satara Municipal Plan Garbage Collection

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..